श्याम उगले
नाशिक (Nashik:) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना पावसामुळे उशीर होऊन नाशिककरांना असुविधांचा सामना करावा लागत असला, तरी सिंहस्थाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त व कुंभमेळा मंत्री यांच्याकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. मात्र, सिंहस्थाच्या निमित्ताने मंजूर केलेल्या कामांपैकी आतापर्यंत केवळ २७ टक्के कामे झाली आहेत. ही सर्व कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित मक्तेदारांना कार्यादेशांमध्ये देण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत ४४ टक्के कामे होणे अपेक्षित असताना त्यापेक्षा १७ टक्के कमी काम झाले आहे. यामुळे ही कामे सिंहस्थापर्यंत कशी पूर्ण होणार, हा कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापर्यंत ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यातील २८ हजार कोटी रुपयांच्या निधीतून साधारणतः कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे.
या २६ हजार कोटींच्या कामांमध्ये रस्ते, पूल, वारसा स्थळांचा विकास, पर्यटन स्थळांचा विकास, पाणी पुरवठा योजना, महावितरण वीज उपकेंद्र, रेल्वे स्थानक, विमानतळ विकास, पोलिस दल सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रण अद्ययावतीकरण, सार्वजनिक आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रकल्प, घाट आदी कामांचा समावेश आहे.
या कामांपैकी २६ हजार कोटींच्या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ती सर्व कामे पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत देण्यात आली आहे. मात्र, या कामांच्या प्रगतीचा ऑगस्ट २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार ही कामे सरासरी केवळ २७ टक्के झालेली आहेत.
ऑगस्ट २०२७ पर्यंत ही कामे ४३ टक्के होणे अपेक्षित होते. मात्र, त्या कामांचा प्रगती बघता आता ही कामे पूर्ण करण्यासाठी केवळ सात महिने हातात आहेत. या २६ हजार कोटींच्या कामांना साधारण नोव्हेंबर २०२५ पासून कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झालेली आहे. मागील आठ-दहा महिन्यांमध्ये केवळ २७ टक्के कामे केलेले ठेकेदार आता उर्वरित सात महिन्यांमध्ये ७३ टक्के कामे कशी पूर्ण करणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे.
एकीकडे नाशिक, त्र्यंबकेश्वर शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदून ठेवले असून पावसाळ्यामुळे उर्वरित रस्त्यांवरही प्रचंड खड्डे पडले असल्याने नागरिकांना त्यावरून वाटचाल करणे अशक्य झाले आहे. याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील अनेक मार्गांचीही कामे सुरू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय नाशिक शहरातील वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे. त्यातच कामाचा वेग अत्यंत कमी असल्यामुळे या रस्त्यांची कामे कधी होणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. या कामांचा वेग बघता ही कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण होतील की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मात्र, महापालिका, कुंभमेळा प्राधिकरण व मंत्र्यांकडून ही सर्व कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे वारंवार सांगितले जात असले, तरी ही कामे करणा-या विभागांनी आतापर्यंत केलेल्या कामांच्या अहवालातून सादर केलेली माहिती या दाव्यांना खोडून काढणारी असल्याचे दिसत आहे.
महापालिकेची केवळ ३० टक्के कामे
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामे करण्याची जबाबदारी ही साधारणपणे १९ विभागांकडे सोपवण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक ९ हजार कोटींची १८ कामे महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून (एमएसआयडीसी) करण्यात येत आहेत. त्या खालोखाल सार्वजनिक बांधकाम विभाग (महामार्ग) व नाशिक महापालिकेकडून अनुक्रमे ४ हजार ३३० कोटी व ३ हजार ७६१ कोटी रुपयांची कामे केली जात आहेत.
नाशिक महापालिकेकडूल केली जाणारी आतापर्यंत केवळ ३० टक्के कामे झाली आहेत. एमएसआयडीसीचीही केवळ १३ टक्के कामे झाली आहेत. यामुळे या विभागांची उर्वरित कामे या कमी वेळात कशी पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे.
विभागनिहाय पूर्ण झालेली कामे
विभाग निधी (कोटी) आतापर्यंत झालेले काम(टक्के) अपेक्षित काम (टक्के)
एस टी महामंडळ ५१ ३० ८१
पुरातत्व विभाग ५५ २४ ६३
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण २४७२ ३७ ६४
सार्वजनिक बांधकाम विभाग ३५४७ १९ ४०
जिल्हा परिषद ११४ ४७ ६४
महावितरण २६१ १० २३
त्रिंबक नगरपरिषद २४५ २० ३२
नाशिक महापालिका ३७६१ ३० ४२
एमएसआयडीसी ९२३० २१ ३३
सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) ४३३० १३ २१
शिर्डी नगरपालिका २४ ३२ ३९
एनएमआरडीए ५ ३ १०
महापारेषण ६७७ ७६ ८१
जलसंपदा विभाग ९१६ २२ २७
पोलिस (ग्रामीण) २११ ४ ९
पोलिस (शहर) १६४ ० ०
मध्यरेल्वे ४५५ ० ०
जिल्हा रुग्णालय १.७२ ० ०
वनविभाग २३ ० ०
(क्रमशः)
Key Points
सिंहस्थाच्या कामांची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७,
कार्यादेश दिलेल्या सुमारे २६ हजार कोटींच्या कामांची ऑगस्टपर्यंत सरासरी २७ टक्के प्रगती,
या टप्प्यावर ४४ टक्के काम अपेक्षित,
प्रत्यक्ष प्रगती अपेक्षेपेक्षा १७ टक्क्यांनी मागे,
सुमारे ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी,
त्यातील सुमारे २८ हजार कोटींची कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची कामे,
नोव्हेंबर २०२५पासून कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात,
उर्वरित सुमारे सात महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण करण्याचे आव्हान,
नाशिक महापालिकेच्या कामांची प्रगती ३० टक्के,
एमएसआयडीसीच्या कामांची प्रगती २१ टक्के,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित कामांची प्रगती १३ टक्के,
रस्त्यांच्या कामांमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर.