सिंहस्थ 2027 नाशिकसाठी 'पर्वणी'! पायाभूत सुविधांना 34,732 कोटींचा 'Infra Boost'

सिंहस्थाच्या कामांमध्ये 83 टक्के निधी कायमस्वरूपी सुविधांसाठी; रस्ते, पूल आणि वाहतूक सुविधांवर मोठा खर्च, मार्च 2027 पर्यंत कामे पूर्ण करण्याचा दावा
Nashik, Startup
Nashik, StartupTendernama
Published on

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. सिंहस्थासाठी मंजूर झालेल्या 34 हजार 732 कोटी रुपयांच्या कामांपैकी 83 टक्के निधी कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर खर्च केला जाणार आहे. या माध्यमातून रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीज, वाहतूक आणि अन्य नागरी सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे नियोजन आहे. ही कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा दावा कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केला आहे.

Nashik, Startup
Nashik Kumbh Mela: ₹34,732 कोटींच्या कामांना गती द्या; कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक आणि पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहस्थाच्या निमित्ताने होणाऱ्या कामांचा दीर्घकालीन फायदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कसा होणार आहे, याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

34,732 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

सिंहस्थाच्या निमित्ताने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत 34 हजार 732 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत.

या निधीतून रस्ते, पूल, घाट, मलनिस्सारण केंद्रे, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, जलवाहिन्या, ऑप्टिकल फायबर, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, रामकाल पथ, शिवदर्शन पथ, पाच रेल्वेस्थानकांचा विकास, ओझर विमानतळाचा विकास, वीज वितरणासाठी पायाभूत सुविधा, पोलिसांसाठी सुविधा, वाहनतळ, सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर, अग्निशमन व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सुविधांचा समावेश आहे.

Nashik, Startup
Nashik: डीपीसीचे दायीत्व वाढता वाढता वाढे! निधी मंजूर 1551 कोटी; विकासकामांसाठी शिल्लक 930 कोटी

भाविकांच्या संख्येचा विचार करून नियोजन

सिंहस्थाच्या प्रमुख अमृतस्नान पर्वणीसह एकूण 44 पर्वण्यांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या काळात नाशिकमध्ये सुमारे 9 कोटी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 3 कोटी भाविक येतील, असा अंदाज गृहीत धरून सुविधा उभारल्या जात आहेत.

या सुविधा सिंहस्थाच्या काळातील भाविकांसाठी उभारल्या जात असल्या, तरी त्यांचा दीर्घकालीन उपयोग स्थानिक नागरिकांना होणार आहे. कायमस्वरूपी पायाभूत सुविधांमुळे नाशिकच्या पुढील किमान 20 वर्षांच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.

रस्ते आणि पुलांवर 59 टक्के निधी

सिंहस्थाच्या निधीपैकी 51 टक्के खर्च रस्त्यांवर, तर 8 टक्के खर्च पूल, उड्डाणपूल आणि अंडरपासवर होणार आहे. म्हणजेच एकूण निधीपैकी 59 टक्के निधी थेट रस्ते आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर खर्च केला जाणार आहे.

यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याबरोबरच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

Nashik, Startup
Nashik Kumbh Mela 2027: मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर

नागरी सुविधांचा दर्जा उंचावणार

कायमस्वरूपी स्वरूपाच्या कामांमुळे नाशिक शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, जलवाहिन्या, वीजपुरवठा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा स्थळांच्या विकासामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगीगड, कावनई, सर्वतीर्थ टाकेद आणि चक्रतीर्थ या ठिकाणच्या पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

त्र्यंबकेश्वरमधील शिवदर्शन पथ आणि नाशिकमधील रामकाल पथ यांसारख्या प्रकल्पांमुळे धार्मिक पर्यटनाला अधिक सुविधा मिळणार आहेत.

रिंगरोडमुळे औद्योगिक वाहतुकीला फायदा

रिंगरोडमुळे वाढवण बंदराच्या दिशेने जाणारी वाहतूक नाशिक शहराबाहेरून वळवता येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असे सिंह यांनी सांगितले.

रेल्वेस्थानकांच्या विकासासह ओझर विमानतळाच्या कामामुळे नाशिककरांच्या दळणवळणाच्या सुविधांमध्येही सुधारणा होणार आहे.

Nashik, Startup
Nashik: डीपीसीचे दायीत्व वाढता वाढता वाढे! निधी मंजूर 1551 कोटी; विकासकामांसाठी शिल्लक 930 कोटी

कायमस्वरूपी सुविधांसाठी 83 टक्के निधी

सिंहस्थासाठी करण्यात येणाऱ्या कामांपैकी 83 टक्के कामे कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची, तर उर्वरित 17 टक्के कामे साधुग्राम आणि अन्य तात्पुरत्या सुविधांशी संबंधित आहेत.

कायमस्वरूपी सुविधांच्या माध्यमातून सिंहस्थाच्या निमित्ताने करण्यात येणारी गुंतवणूक केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता नाशिकच्या नागरी विकासाचा दीर्घकालीन आधार ठरण्याची अपेक्षा आहे.

Key Points

  • 34,732 कोटी रुपये : सिंहस्थाच्या निमित्ताने मंजूर झालेल्या विविध विकासकामांची किंमत,

  • 83 टक्के निधी : कायमस्वरूपी पायाभूत सुविधांसाठी,

  • 51 टक्के निधी : रस्त्यांच्या कामांसाठी,

  • 8 टक्के निधी : पूल, उड्डाणपूल आणि अंडरपाससाठी,

  • 9 कोटी भाविक : सिंहस्थाच्या काळात नाशिकमध्ये येण्याचा अंदाज,

  • 3 कोटी भाविक : त्र्यंबकेश्वरमध्ये येण्याचा अंदाज,

  • 20 वर्षांचा विकास : कायमस्वरूपी सुविधांमुळे नाशिकच्या पुढील विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा,

  • मार्च 2027 : सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन,

  • 17 टक्के निधी : साधुग्राम आणि अन्य तात्पुरत्या सुविधांसाठी,

  • रिंगरोडचा फायदा : वाढवण बंदराकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळवण्यास मदत होणार.

Tendernama
www.tendernama.com