

मुंबई (Mumbai): नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्याची प्रगती समाधानकारक नसल्याचे नमूद करत, कामांमध्ये दिरंगाई किंवा विभागांतील समन्वयाचा अभाव खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामांची सद्यस्थिती, प्रलंबित निर्णय आणि अंमलबजावणीच्या वेळापत्रकाचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कामांची प्रगती महिनाभरात दिसावी
मुख्यमंत्र्यांनी सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा घेतला जाणार असून, तोपर्यंत प्रत्येक विभागाच्या कामात गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसली पाहिजे. कोणतेही काम विभागांतील समन्वयाअभावी रखडू नये आणि प्रत्येक यंत्रणेने निश्चित जबाबदारीनुसार काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि सुरू असलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच विकासकामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवण्यासाठी वाहतूक आणि कामांचे नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.
रिंग रोड-साधुग्रामला प्राधान्य
महानगर गॅस कंपनीने नाशिक महापालिकेशी समन्वय साधून प्रलंबित गॅस जोडणीची कामे तातडीने पूर्ण करावीत. रिंग रोड, साधुग्राम, रेल्वे स्थानकांचा विकास, विस्तृत पार्किंग व्यवस्था आणि ४,५०० विशेष एसटी बससंबंधी कामांना प्राधान्य द्यावे. भूसंपादनासह महत्त्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करून एप्रिल २०२७ मध्ये वापरासाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
‘डिजिटल कुंभ’साठी AIचा वापर
बैठकीत १२ कोटी भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ दर्शनासाठी वाहतूक, निवास, स्वच्छता, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधांचे नियोजन सादर करण्यात आले. गर्दी नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘कुंभदूत’ एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी तात्पुरती शौचालये, कचराकुंड्या, कपडे बदलण्याच्या खोल्या आणि आवश्यक स्वच्छता कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथके, स्वयंसेवक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. स्थानिक युवकांसाठी पर्यटन, आदरातिथ्य, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण राबविण्याचेही प्रस्तावित आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्र व राज्य शासन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. सिंहस्थ हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून, नागरिकांना कमीत कमी त्रास देत सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागांनी स्वीकारावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
Key Points
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकासकामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
कुंभमेळ्याच्या कामांची सध्याची प्रगती समाधानकारक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
सर्व विभागांच्या कामांचा एक महिन्यानंतर पुन्हा आढावा घेतला जाणार.
वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना.
नाशिक रिंग रोड, साधुग्राम, रेल्वे स्थानके, पार्किंग आणि ४,५०० विशेष एसटी बसच्या नियोजनाला प्राधान्य.
१२ कोटी भाविकांच्या अपेक्षित उपस्थितीच्या दृष्टीने वाहतूक, निवास, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन.
‘डिजिटल कुंभ’अंतर्गत एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग आणि गर्दी नियंत्रण तंत्रज्ञानाचा वापर.
भूसंपादन आणि महत्त्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
पूर्ण झालेल्या सुविधा एप्रिल २०२७ मध्ये प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश.
नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने विकासकामांचे नियोजन करण्यावर भर.