Nashik MHADA Land Scam: बिल्डरांचे 'लाड' भोवले; 150 कोटींच्या घोटाळ्यात नाशिकच्या 'त्या' तहसीलदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तुकडे बंदी कायद्याचा गैरवापर करून गरिबांच्या हक्काच्या घरांवर घातला दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या एसआयटीच्या घोषणेनंतर पोलिसांची मोठी कारवाई
Nashik MHADA Land Scam
Nashik MHADA Land ScamTendernama
Published on

नाशिक (Nashik): महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि बड्या बिल्डरांच्या अभद्र युतीचा पर्दाफाश करत नाशिक पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. नाशिकमधील म्हाडा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांना १५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी 'एसआयटी' (SIT) स्थापन केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. या अटकेमुळे नाशिकच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik MHADA Land Scam
Nashik MHADA Land Scam: नगररचना विभागाचा 'त्या' बिल्डरांना दणका; 26 लेआउट रद्द

ज्या अधिकाऱ्यांनी सरकारी नियमांची अंमलबजावणी करून सर्वसामान्यांचे हित जपायचे असते, त्यांनीच बिल्डरांच्या फायद्यासाठी कायद्याची मोडतोड केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकचे अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांनी तुकडे बंदी कायद्याचा अक्षरशः खेळ मांडला होता, ज्याची परिणती त्यांच्या अटकेत झाली आहे.

Nashik MHADA Land Scam
Nashik MHADA Land Scam: म्हाडाच्या फसवणुकीसाठी केलेल्या 49 फेरफार नोंदी रद्द होणार

काय आहे नेमका घोटाळा?
हा घोटाळा प्रामुख्याने नाशिकमधील 'म्हाडा' (MHADA) घरांशी संबंधित आहे. नियमानुसार, मोठ्या भूखंडांवर गृहप्रकल्प उभारताना २० टक्के सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) राखीव ठेवणे बंधनकारक असते. मात्र, अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांनी आपल्या कार्यकाळात सुमारे ३१ प्रकरणांमध्ये आपल्या अधिकाराचा गैरवापर केला.

त्यांनी एक एकर क्षेत्राच्या भूखंडांचे नियमबाह्य पद्धतीने छोटे छोटे तुकडे (विभाजन) केले. हे विभाजन करताना 'तुकडे बंदी' कायद्याच्या तरतुदी धाब्यावर बसवण्यात आल्या.

या विभाजनामुळे संबंधित बिल्डरांना २० टक्के राखीव सदनिका देण्याच्या अटीतून पळवाट मिळाली. परिणामी, गरिबांच्या हक्काचे सुमारे १५० कोटींचे फ्लॅट्स खुलेआम विकून बिल्डरांनी गल्ला भरला आणि सरकारी तिजोरीचे नुकसान केले.

Nashik MHADA Land Scam
Nashik MHADA Land Scam: चौकशी समितीची दिशाच भरकटली

राजकीय पडसाद आणि एसआयटीची स्थापना
या घोटाळ्याचा विषय विधिमंडळातही चांगलाच गाजला होता. नाशिकच्या आमदार सीमा हिरे आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवला होता. प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरच पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Nashik MHADA Land Scam
नाशिक ZP सोलर घोटाळा : अंदाजपत्रक ‘कॉपी-पेस्ट’, तांत्रिक मान्यता नियमबाह्य

बिल्डरांचे धाबे दणाणले
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १९४ जणांवर गुन्हे दाखल असून त्यात नाशिकमधील ४९ नामांकित बिल्डरांचा समावेश आहे. यापूर्वी पोलिसांनी काही मध्यस्थांना अटक केली होती, मात्र मुख्य अधिकारी असलेला अप्पर तहसीलदार मोकाट होता. नितीन पाटील यांच्या अटकेमुळे आता या घोटाळ्यातील लाभार्थी असलेल्या बड्या बिल्डरांचेही धाबे दणाणले आहेत. महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होणे अशक्य असल्याचे तपासातून समोर येत आहे.

Nashik MHADA Land Scam
गोष्ट न बघितलेल्या कायद्याच्या बालेकिल्ल्याची; सिंहस्थाचे काम अडवण्याची आता कोणात हिम्मतच उरली नाही!

महत्वाचे मुद्दे

  • नाशिकचे अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांना १५० कोटींच्या म्हाडा घोटाळ्यात अटक.

  • तुकडे बंदी कायद्याचा गैरवापर करून ३१ प्रकरणांत बेकायदा भूखंड विभाजन केल्याचा ठपका.

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव २० टक्के सदनिका बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या एसआयटीच्या तपासातून कारवाई.

  • या गुन्ह्यात एकूण १९४ आरोपी असून त्यात नाशिकमधील ४९ बड्या बिल्डरांचा समावेश आहे.

Tendernama
www.tendernama.com