

नाशिक (Nashik): त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे २०२७ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका, त्र्यंबकेश्वरमधील मंदिरे, दर्शन पथ, गोदावरी घाट, गोदावरी बारमाही वाहती करणे, तीर्थांचा विकास, बसस्थानक विकास, पाणी पुरवठा योजना यासह त्र्यंबकेश्वरला जोडणा-या रस्त्यांसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, राज्याचा पर्यटन विभाग, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधका विभाग यांनी ३४४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ही सर्व कामे त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी म्हणजे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. या ३४७४ कोटींच्या विकासकामांमध्ये त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीत सुमारे ११०० कोटींची कामे होणार असून इतर मंजुरी दिलेली कामे ही प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरला जोडणारे राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांची आहेत. तसेच ३५ कोटींची कामे इगतपुरी तालुक्यातील कावनई व सर्वतीर्थ टाकेद परिसरात होणार आहेत.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक येणार आहे, हे गृहित धरून राज्य व केंद्र सरकारने तीर्थक्षेत्र विकास, भाविकांना स्नानासाठी घाट बांधणे, रिंगरोड उभारणे, मलनिस्सारण केंद्र उभारणे, अंतर्गत रस्ते उभारणे आदी कामांसाठी जवळपास २५ हजार कोटींचा सिंहस्थ विकास आराखडा तयार केला असून त्यातील ३४४२ कोटींची कामे त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थासाठी मंजूर केली आहेत.
या कामांमध्ये त्र्यंबकेश्वर पालिका हद्दीतील रस्ते, शहर विकास आराखड्यातील रस्ते, त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनपथ, बसस्थानक विकास, वाहनतळ, वाढीव पाणी पुरवठा योजना आदी कामांचा समावेश आहे.
पालिका हद्दीत २८६ कोटींचे रस्ते
सिंहस्थ विकास आराखड्यातून कुंभमेळा प्राधिकरणने त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीमध्ये त्र्यंबकेश्वर शहर विकास आराखड्यातील १२ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १८२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली असून हा निधी तीर्थक्षेत्र विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याशिवाय नीलपर्वत रस्ता, गंगा मंदिर रस्ता, श्रीनाथघाट ते एमटीडीसीपर्यंत रिंगरोड. संतनिवृत्तीनाथ मंदिर ते नगरपालिका कार्यालय मार्ग, मोतीतलाव ते बिल्वतीर्थ रस्ता ही कामे केली जाणार आहेत. तसेच या भूमिगत पावसाळी गटारी, विद्युतीकरण, ऑप्टीकल फायबर आदी कामे केली जाणार आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी ६३१ कोटी
त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग असून येथे देशभरातून भाविक येत असतात. सिंहस्थाच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक येणार असल्यामुळे या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाताना सुविधा असणे, तीर्थस्थळांचा विकास करणे यासाठी ६३१ कोटी रुपये निधीतून विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.
या कामांमध्ये प्रामुख्याने गोदावरी बारमाही वाहती ठेवण्यासाठी गौतमी गोदावरी या धरणातून उपसा सिंचन योजना राबवून ते पाणी अहल्याधरणात टाकून अहल्या गोदावरी संगमापासून गोदावरी वाहती ठेवून भाविकांना स्नानाची सुविधा करण्यासाठी ३२८.८० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनपथ उभारणे (६८ कोटी), गोदावरीच्या दोन्ही काठावर घाट बांधणे (१७७.८६ कोटी) ही कामे मंजूर केली असून त्र्यंबकेश्वरमधील इतर तीर्थस्थळे, मंदिर, कुंड यांच्या विकासासाठीही जवळपास २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर बसस्थानक उभारणे, शौचालय उभारणे, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन, वाढीव पाणीपुरवठा योजना, ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारणे ही कामे केली जाणार आहेत.