

नाशिक (Nashik): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील जीर्ण बसस्थानकांच्या जागेवर नवीन बसस्थानके उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पेठ येथील बसस्थानकही नव्याने बांधण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून या बसस्थानकाचे काम सुरू असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिक प्रथमपासूनच ओरड करीत आहेत. तरीही यंत्रणेने लक्ष दिले नाही. (Peth ST Bus Stand Building Demolition News)
अखेर नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बांधकामाची पाहणी केली. यात काम गुणवत्तापूर्ण नसल्याचे आढळून आले. यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी या नित्कृष्ट बांधकाम तातडीने पाडण्याची नोटीस कंत्राटदार व्ही. टी. परदेशी यांना बजावली आहे.
पेठ येथील बसस्थानकाची इमारत अतिशय जीर्ण झाल्याने राज्य परिवहन विभागाने तेथे नवीन बसस्थानक बांधण्यास मंजुरी दिली. पेठ बसस्थानकाची पुनर्बांधणी व वाहनतळाचे काँक्रिटीकरणासाठी महामंडळाने सात कोटी ९६ लाख एकतीस हजार रुपये मंजूर केले आहेत.
नवीन इमारतीच्या बांधकामासाठी जुने बसस्थानक वर्षभरापूर्वी पाडण्यात आले. नवीन इमारतीचे बांधकाम बारा महिन्यात पूर्ण करण्याबाबत कार्यारंभ आदेशात नमूद करण्यात आले होते. हे बांधकाम सुरू होऊन सुमारे दोन वर्षे कालावधी उलटून गेला आहे, तरीही काम पूर्ण झालेले नाही. या बसस्थानकाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या पहिलापासून तक्रारी होत्या. या बसस्थानकाच्या पिलरवर हाताने थापा मारताच सिमेंट खाली पडते. तसेच बांधकामात उभारलेले कॉलम प्लॅननुसार एका रेषेत नसल्याच्याही तक्रारी होत्या.
सुरुवातीला परिवहन महामंडळ प्रशासनाने या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगून हात वर केले.
दरम्यान, सजग नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, विभागीय अभियंता चैताली भुसारे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांच्या पथकाने बांधकामाची पाहणी केली. त्यात नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यांनी बसस्थानकाचे काम नित्कृष्ट असल्याचा अभिप्राय देत ते बांधकाम पाडण्याची नोटीस संबंधित ठेकेदाराला बजावली.
दरम्यान आता बांधकाम पूर्ण करण्याग झालेला विलंब व प्रवाशांच्या गैरसोयींबाबत वरिष्ठ स्तरावरील अधिका-यांकडे दाद मागण्या येणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या बसस्थानकाच्या बांधकामाच्या टेंडरमधील बाबींचे उल्लंघन झालेले असून मंजूर खर्च आणि प्रत्यक्ष होणारे बांधकाम यामध्ये मोठी तफावत आहे. यामुळे ठेकेदाराला दंड आकारण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.