

नाशिक (Nashik): सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराभोवती सिंहस्थ परिक्रमा मार्ग (रिंगरोड) राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे उभारणार आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली असताना आता केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या संरेखन मंजुरी समितीनेही या ४७.९० किलोमीटरच्या सिंहस्थ परिक्रमा मार्गाला मान्यता दिली आहे. या रिंगरोडसाठी ५ हजार ८०५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
हा रिंगरोड आडगाव येथील ट्रक टर्मिनसपासून सुरू होऊन रायगड नगर येथे संपणार आहे. देवळाली कँप परिसरातील संरक्षण विभाग व एकलहरे औष्णिक वीज केंद्र या संवेदनशील भागामुळे त्या परिसरातून रिंगरोडला मान्यता दिली नाही. यामुळे राज्य सरकारने सूचवलेल्या ७७ किलोमीटरपैकी ४७.९० किलोमीटरच्या मार्गाला मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारच्या मान्यतेमुळे सिंहस्थापूर्वी हा रिंगरोड होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणतर्फे हे काम होणार असून या कामाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळावर सोपवण्यात आलेली आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून या सिंहस्थकाळात बाहेरून येणा-या वाहनांना नाशिक शहराबाहेरून मार्गक्रमण करता यावे, यासाठी बाह्यरिंगरोड प्रस्तावित करण्यात आला आहे. या रिंगरोडसाठी यापूर्वी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने पुणे येथील खासगी कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला होता. मात्र, त्यानंतर हा रिंगरोड राज्य व केंद्र सरकारने संयुक्तपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने या मार्गाला हिरवा कंदील दिल्यानंतर या बाबत वेगाने हालचाली झाल्या असून राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या ७७ किलोमीटर पैकी ४७.९० म्हणजे जवळपास ४८ किलोमीटर लांबीला मान्यता दिली आहे.
राज्यस्तरावरून रिंगरोडचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे सादर करताना पाच प्रकारचे संरेखन (मार्गिकेचा आराखडा) दिले होते. त्यातील ४७.९० किलोमीटरच्या रिंगरोडला मान्यता दिली आहे. प्रस्तावित रिंगरोड नाशिक-तवा-वाढवण या महामार्गाला गोंदेदुमाला येथे मिळणार आहे. यामुळे या रिंगरोडवरून वाहनांना वाढवण बंदराकडे जाता येईल तसेच समृद्धी महामार्गालाही जाता येणार आहे. त्याचप्रमाणे आडगाव ट्रक टर्मिनल येथे हा रिंगरोड नाशिक-चेन्नई या मार्गाला जोडला जाणार आहे.
या रिंगरोडसाठी ५ हजार ८०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग उभारल्यानंतर नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. रिंगरोडसाठी नाशिक शहराभोवतीच्या १८ गावांमधील ३०५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यामध्ये २७ घरे हटविण्यात येतील, तसेच २९ ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यात येईल.
या संरेखन मंजुरी समितीने महाराष्ट्र सरकार व एमएसआयडीसीला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून भूसंपादन व टेंडर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित म्हणजे पाथर्डी ते आडगाव या भागासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. नाशिककरांना तब्बल दोन दशकांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आला आहे.
असा आहे रिंगरोड
आडगाव येथील ट्रक टर्मिनसपासून हा रिंगरोड सुरू होऊन दिंडोरी रोड, पेठरोडला ओलांडून तो गंगापूरमार्गे पिंपळगाव बहुले येथून नाशिक त्र्यंबक मार्ग ओलांडून दुडगाव शिवारातून रायगड नगर येथे मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणार आहे. तसेच हा रिंगरोड गोंदेदुमाला येथे नाशिक-तवा-वाढवण या महामार्गाला जोडणार असून आडगाव टर्मिनल येथून नाशिक-चेन्नई तथा नाशिक-अक्कलकोट या महामार्गाला जोडला जाणार आहे.
सिंहस्थ परिक्रमा मार्गाची वैशिष्ट्ये
प्रकल्पात सात ठिकाणी दरीमार्ग
चौपदरी व सहापदरी असणार मार्ग
रिंगरोडवर तीन मोठे, १८ छोटे पूल
ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहने धावणार