Nashik: त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 50 कोटींचा निधी; दर्शनपथला मिळणार चालना
नाशिक (Nashik) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाने २७५ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २७५ कोटींपैकी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आराखड्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनपथासह विविध विकासकामांसाठी वापरला जाणार असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने त्र्यंबकेश्वरचा तीर्थक्षेत्रांच्या अ दर्जामध्ये समावेश केला आहे. त्यानुसार तीर्थक्षेत्र विकास योजनेत ३०० कोटींच्या विकासकामांचा समावेश करून वेगळा आराखडा सादर करण्यात आला आहे.
या आराखड्याला मंत्रिमंडळाने २७५ कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. यावर्षी अर्थसंकल्पात मोठी बांधकामे या सदराखाली ५४१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ५० कोटींचा निधी हा त्र्यंबकेश्वरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी वापरण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणच्या खात्यात वर्ग केला आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने आतापर्यंत हजार कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा प्राधिकरणकडे वर्ग केला असून या अधिवेशनातीव पुरवणी मागण्यांमध्ये आणखी तीन हजार कोटींची मागणी केली आहे. त्यात आता आणखी ५० कोटींची भर पडल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये मूलभूत सुविधा, पर्यटक सेवा, क्षेत्र विकास आणि कुंभमेळ्याशी संबंधित इतर कामांना गती मिळू शकणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यापैकी काही कामे तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्याबाबतचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील कामांपैकी त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनपथ व डीपी रोडची कामे ही महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
सरकारने आता या कामांसाठी ५० कोटी रुपयं निधी कुंभमेळा प्राधिकरणच्या खात्यात वर्ग केल्यामुळे या आराखड्यातील कामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निधी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी असून उर्वरित निधीची तरतूद पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात केली जाईल.
तीर्थक्षेत्र विकाम आराखड्यातून होणारी कामे
दर्शनपथाचे सुशोभीकरण
परिसरातील मंदिरांचे नूतनीकरण व सक्षमीकरण
पुरातन मंदिरे व कुंडांची देखभाल, दुरुस्ती
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण, वाहनतळांची उभारणी
स्वच्छतागृहांची वाढ आणि नूतनीकरण
स्नान घाटांची बांधणी

