

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नानाला खूप महत्व आहे. सिंहस्थ पर्वणी काळात केवळ रामकुंडात डुबकी मारण्यासाठी कोट्यवधी भाविक येत असतात. यामुळे भाविकांना डुबकी मारण्यासाठी शुद्ध पाणी असावे, या हेतूने नाशिक महानगरपालिकेने गोदावरी नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चार मलनि:स्सारण केंद्रांची क्षमतावृद्धी करून त्यांचे अत्याधुनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १,४५० कोटी रुपयांच्या गोदावरी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत चार नव्या मलनि:स्सारण केंद्रांचे (एसटीपी) बांधकाम सुरू केले आहे.
हे चारही प्रकल्प जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेकडून तपोवन (१८० एमएलडी), आगारटाकळी (९७ एमएलडी), चेहेडी (६४ एमएलडी) व पंचक (७५ एमएलडी) या चार ठिकाणी दिवसाला १५ दलघफू पाणी शुद्ध करण्याची क्षमता असलेले मलनिस्सारण केंद्रांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे.
गोदावरी नदी नाशिक शहराच्या मध्यातून जाते. गोदावरीच्या काठावर त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. मात्र, गोदावरी काठी उभारण्यात आलेल्या मलनिस्सारण केंद्रांची अपुरी क्षमता व अनेक नाल्यांच्या माध्यमातून सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय गोदावरीत सोडणे यामुळे गोदावरी मोठ्याप्रमाणावर प्रदूषित झाली आहे.
नाशिक महापालिका हद्दीत जवळपास २१ नाल्यांच्या माध्यमातून पाणी थेट गोदावरीत सोडले जाते. मागील सिंहस्थातही उच्च न्यायालयाने गोदावरीत थेट सांडपाणी सोडू नये, असे आदेश दिले होते. त्यावेळी प्रशासनाने ते नाले बंद करून तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना केली होती. सिंहस्थानंतर ते पाणी पुन्हा गोदावरीत सोडले गेले. यामुळे गोदावरी स्वच्छता हा संवेदनशील विषय झाला आहे.
गोदावरीच्या पात्रात मोठ्याप्रमाणावर पाणवेली असून गोदावरीत सांडपाणी सोडल्यामुळेच पाणवेलींची संख्या वाढली आहे. यामुळे गोदावरीचे शुद्धीकरण करण्यासाठी पूर्ण क्षमतेचे व अत्याधुनिक स्वरुपाचे मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सध्या शहरातील एकूण मलनिस्सारण केंद्रांची क्षमता ३४२ (एमएलडी) म्हणजे दिवसाला १२ दलघफू आहे. मात्र, या मलनिस्सारण केंद्रांची जैविक ऑक्सिजन मागणी (बीओडी) पातळी २५ ते ३० च्या दरम्यान आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मापदंडानुसार या प्रक्रियायुक्त पाण्याचा बीओडी १० च्या आत असणे आवश्यक आहे. यावरून गोदावरीच्या प्रदूषण पातळीची कल्पना येते.
महापालिकेची जुनी १० मलनिस्सारण केंद्रे असून त्यांचे अद्ययावतीकरण करण्यावर खर्च करण्यापेक्षा नवीन केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार चार ठिकाणी मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार असून त्यांची क्षमता ४१६ एमएलडी म्हणजे दिवसाला १५ दलघफू आहे. याशिवाय या आधुनिक मलनिस्सारण केंद्रांमुळे गोदावरीत सोडल्या जाणा-या पाण्याचा बीओडी ५ च्या आत असणार असल्याचा दावा केला जात आहे.
आगारटाकळी येथील जुन्या ७० एमएलडी क्षमतेच्या एसटीपीचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात १० सांडपाणी उपसा केंद्रे, २१ नाल्यांमधून सांडपाणी नव्या एसटीपीकडे वळवणे आणि नव्या सांडपाणी पाइपलाइन टाकणे यांचा समावेश आहे.
गोदावरी नदीवरील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या एसटीपीचे सुमारे ३० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. हे नवे प्रकल्प पर्यावरण नियमांचे पूर्ण पालन करतील आणि गोदावरीची पाण्याची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारतील, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे