

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारण्यात येणा-या साधुग्रामसाठी अतिरिक्त ३५० एकरापेक्षा अधिक जमीन देण्यास विरोध करणाऱ्या जमीन मालकानी आता महापालिकेचा जमिनीच्या बदल्यात ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला देण्याचा प्रस्तावही फेटाळला आहे.
महापालिकेने प्रस्तावित केलला बाजारमूल्य तक्त्यातील दर हा मुळातच बाजारभावापेक्षा कमी आहे. यामुळे साधुग्रामच्या आजूबाजूच्या शिवारातील बाजारमूल्य दरापेक्षा अधिक दर मिळावा, अशी जमीन मालकांची इच्छा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला प्रति एकरला दहा कोटी रुपये दर मागितला आहे. यामुळे महापालिका प्रशासनासमोर साधुग्रामसाठी भूसंपादन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या सिंहस्थात येणा-या साधुमहंतांसाठी तपोवनात साधुग्राम उभारले जाते. महापालिकेने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षण टाकले आहे. त्यातील ९७ एकर जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. उर्वरित जागा मोबदला देऊन ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जवळपास २८० स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सुनावणी घेतली.
महापालिकेने आरक्षणाव्यतिरिक्तही ३५० एकर जागा साधुग्रामसाठी भाडेतत्वावर घेण्यासाठी संबंधित जमीन मालकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. या शेतकऱ्यांनी भाडेतत्वावर जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. या शेतक-यांनीही महापालिकेत येऊन साधुग्रामचे आरक्षित जागा घेण्यासाठी झालेल्या सुनावणीवेळी साधुग्रामसाठी आरक्षण नसलेली जागा भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव नाकारला. शेतकरी कृती समितीचे समाधान जेजुरकर तसेच रमेश कोठुळे, शिवाजी गायकवाड, शिवाजी गवळी, योगेश जेजुरकर, दिनकर चौधरी यांनी बाजू मांडली.
दरम्यान साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी भूसंपादनाचा मोबदला बाजारमूल्य तक्त्यानुसार दिला जाणार आहे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सुनावणीवेळी शेतकऱ्यांसमोर ठेवला. महापालिकेच्या बाजारमूल्य तक्त्यानुसार साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या भागातील जमिनीचे दर ७१९० रुपये प्रतिचौरस मीटर आहे.
शेतक-यांनी या प्रस्तावाला विरोध करताना छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत एका बाजूला १६,९०० रुपये, तर दुसऱ्या बाजूला १०,३८० रुपये प्रतिचौरस मीटर दर आहे, असे निदर्शनास आणून दिले. तसेच काही जागा मालकांनी प्रतिचौरस २६,००० रुपये दराची मागणी केली.
दरम्यान यावेळी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने एकीकृत नियमावलीतील तरतुदीनुसार देय होणारा टीडीआर व ५० टक्के क्षेत्राचा भूसंपादनाचा रोख मोबदला दिला जाईल, असा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव सर्व जमीन मालकांनी धुडकावून लावला.
तपोवनात साधुग्रामसाठी राखीव असलेल्या जागेवर माईस हब उभारण्याचे महापालिका प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. यावेळी सर्व जमीन मालकांनी त्यांची जागा इतर संस्थांना देण्यास विरोध केला व माईस हब आम्ही स्वत: उभारतो, असा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला.
यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शेतकऱ्यांना मोबदला देताना विश्वासात घेतले जाईल. त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. तसेच दराबाबत अडून राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोबदल्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी पुन्हा बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.