

नाशिक (Nashik): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सहाही विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने जवळपास १४ हजार चालक व सहायक यांच्या भरतीसाठी संस्था नेमण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र, यासाठी एकाही विभागामध्ये कोणीही बिडधारक सहभागी न झाल्याने आतापर्यंत चार वेळा या टेंडरला मुदतवाढ द्यावी लागली आहे. शेवटची मुदतवाढ १४ जानेवारी २०२६ रोजी देण्यात आली आहे.
राज्यभरासाठी जवळपास १६५२ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. दरम्यान कंत्राटी पद्धतीने चालक भरती करण्यास कर्मचारी संघटनांनी विरोध करूनही महामंडळ या एजन्सी नेमन्यावर ठाम असल्याने या टेंडरला गेल्या तीन महिन्यांत चारवेळा मुदतवाढ दिली आहे. यामुळे या भरतीचे भवितव्य अंधारात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (MSRTC) ८,००० नवीन बस येणार आहेत. त्या बस खरेदीची प्रक्रियाही महामंडळाने सुरू केली आहे. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागणार आहे. हे लक्षात घेऊन सप्टेंबर २०२५ मध्ये महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत १७,४५० चालक आणि सहायकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या कंत्राटी भरतीसाठी महामंडळाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी टेंडर प्रसिद्ध करून मनुष्य बळ पुरवणाऱ्या संस्थांकडून देकार मागवले आहेत. यात पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर या प्रत्येक विभागात एक या प्रमाणे मनुष्यबळ पुरवठादार संस्था नेमण्यात येणार आहे.
या संस्थांना तीन वर्षांसाठी चालक व सहायक पुरवण्याचे टेंडर दिले जाणार आहे. यात या संस्थेने कर्मचाऱ्यांना ३०,००० रुपये मासिक वेतन द्यायचे आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र परिवहन कायद्यानुसार ओव्हर टाइम भत्ता द्यायचा असून साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक आहे.
न्यायालयाने २०२४ पर्यंत नियमित भरतीवर बंदी घातली होती, तसेच अनेक कर्मचारी नियत वयानुसार निवृत्त होत असल्याने आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांसाठी चालक व सहायक भरती होत आहे.
विभागनिहाय कंत्राटी भरती
महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या टेंडरनुसार राज्यातील सहाही विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने १३ हजार ९८० चालक व सहायक यांची भरती केली जाणार आहे. त्यात नागपूर विभागात १२१० चालक भरती करण्यासाठी १४५.५२ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. अमरावती विभागात ८४० चालक भरतीसाठी १०० कोटींचे टेंडर आहे. पुणे विभागात ३३३० चालक व सहायक यांच्या भरतीसाठी ३९६.१५ कोटींचे टेंडर आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक ३६५० चालक व सहायक यांच्या भरतीसाठी ४२९.९३ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. नाशिक विभागात २९३० चालक व सहायक यांच्या कंत्राटी भरतीसाठी ३४४.५३ कोटींचे टेंडर आहे, तर छत्रपती संभाजी नगर विभागात २०२० चालक व सहायक यांच्यासाठी २३६.४४ कोटींचे टेंडर आहे.
चारवेळा मुदतवाढ
राज्यातील सहाही विभागात १३९८० चालक व सहायक यांचा कंत्राटी पद्धतीने पुरवठा करण्यासाठी प्रत्येक विभागनिहाय एक या प्रमाणे एजन्सी नियुक करण्यासाठी १६ ऑक्टोबरला टेंडर प्रसिद्ध केले. मात्र, त्यासाठी एकही बिडधारक सहभागी झाला नाही. यामुळे मागील तीन महिन्यांत महामंडळाने ११ नोव्हेंबर, २४ नोव्हेंबर, ९ डिसेंबर, २४ डिसेंबर व आता १४ जानेवारी २०२६, अशी या टेंडरला चारवेळा मुदतवाढ दिली आहे.
एकीकडे कर्मचारी संघटनांचा विरोध दुसरीकडे मनुष्यबळ पुरवण्यासाठी कोणी इच्छुक नसणे, या कारणांमुळे या भरतीचे भवितव्य अद्याप अंधारात असल्याचे दिसत आहे.