

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीमधून २७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनपथ, टॉयलेट बॉक्स, डीपी रोड करण्यात येणार आहे. त्यातील दर्शनपथ व टॉयलेट ब्लॉक उभारणासाठी महाराष्ट्र पायाभूत विकास, महामंडळाने ६७ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
या निधीतून त्र्यंबकेश्वर दर्शनपथातील पहिल्या टप्प्यातील काम केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यातील दर्शनपथाची कामे आता सिंहस्थानंतरच होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर केलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनपथाचा आणखी विस्तार करून त्र्यंबकेश्वरच्या पर्यटनात वाढ करण्याचे नियोजन कुंभमेळा विकास प्राधिकरणाने केले होते. मात्र, त्यासाठी काही सरकारी कार्यालयांबरोबर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित करावे लागणार होते. मात्र, आता सिंहस्थाला केवळ दीड वर्षांचा कालावधी उरला असून या वेळेत नवीन कार्यालयांचे बांधकाम होणे अवघड असल्याने सिंहस्थापूर्वी केवळ पहिल्या टप्प्यातील दर्शनपथाचे काम करण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी प्रत्येक १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर हे प्राचिन शहर वसलेले असून या मंदिर परिसरातील दाट लोकवस्ती व मंदिराची रचना यामुळे या मंदिरात दिवसभरात केवळ १५ हजार भाविक दर्शन घेऊ शकतात.
यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात दर्शनपथाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या दर्शनपथाचा विस्तार केल्यास त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊ शकणा-या भाविकांची संख्या वाढेल व त्र्यंबकेश्वराच्या पर्यटनात वाढ होईल, या हेतूने कुंभमेळा प्राधिकरणने नवीन दर्शनपथ आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या नवीन आराखड्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील तहसील कार्यालयासह इतर सरकारी कार्यालये, उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित करावे लागणार होते. तसेच त्या भागातील काही रहिवाशी परिसरातील नागरिकांनाही स्थलांतरित व्हावे लागणार होते. या सर्व बाबींचा विचार करता त्र्यंबकेश्वरमधून या स्थलांतराला विरोध होत होता. मात्र, प्रशासनाने सर्व सरकारी कार्यालयांसाठी त्र्यंबकेश्वरबाहेर नाशिक रस्त्यावर सरकारी जागेत एकच मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव मांडला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत आराखडा तयार करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्र्यंबकेश्वरमधून उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराला विरोध करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण भागातून नागरिक उपचारासाठी येतात. ते उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित झाल्यास नागरिकांना पुन्हा खर्च करून त्या गावाबाहेरील रुग्णालयात पोहोचावे लागेल. यामुळे त्यांच्या त्रासात वाढ होईल, या कारणाने विरोध झाला. यामुळे प्रशासनाने मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही.
त्याच दरम्यान त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांनी हा प्रचाराचा मुद्दा बनवला. याचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना फटका बसला. यामुळे या विस्तारित दर्शनपथाच्या प्रस्तावाला राजकीय पाठिंबा मिळेनासा झाल्याने प्रशासनानेही याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
यामुळे तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंजूर झालेल्या निधीतून आता दर्शन पथाच्या पहिल्या टप्प्यातील कामे करून घेऊ व उरलेला दुसरा टप्पा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर करू असा निर्णय झाल्याचे समजते. यामुळे कुंभमेळा प्राधिकरणने सार्वजनिक बांधकाम विभागाला त्र्यंबकेश्वर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचवेळी महाराष्ट्र पायाभूत विकास प्राधिकरणने ६७ कोटींच्या दर्शनपथाला चालना देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. यामुळे या सिंहस्थापर्यंत तरी उपजिल्हा रुग्णालय, तहसीलदार कार्यालयांसह इतर कार्यालये यांचे स्थलांतर टळले असल्याचे मानले जात आहे.