

नाशिक (Nashik): नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार सिंहस्थाशी संबंधित जवळपास २५ हजार कोटींच्या कामांना तत्वता मान्यता दिली आहे. शिर्डीला जोडणारे रस्ते, शिर्डी विमानतळाशी संबंधित कामे, शनिशिंगणापूर येथेही सिंहस्थाशी संबंधित कामांचा विकास आराखडा तयार करून त्या कामांची अंमलबजावणी केली जात असताना ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडणा-या व मागील सिंहस्थात तयार केलेल्या रस्त्याकडे कुंभमेळा विकास प्राधिकरणने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत सिंहस्थाशी संबंधित जवळपास सर्व प्रमुख मार्गांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या असताना अद्याप या रस्त्याला मान्यता मिळाली नसल्याने सिंहस्थ नियोजनातून हा रस्ता सुटला असल्याचे दिसत आहे.
ओझर ते शिर्डी हा मार्ग गुजरातकडून शिर्डीला जाणा-या भाविकांसाठी सोयीचा आहे. तसेच शिर्डी येथून नाशिकला पंचवटीत येण्यासाठी भाविकांसाठी तो सर्वात जवळचा मार्ग आहे. ओझर-शिर्डी (राज्यमार्ग ३५) हा मार्ग निफाड, सिन्नर, कोपरगाव व राहता या तालुक्यांमधून जाणारा मार्ग आहे. मागील सिंहस्थात या मार्गाचे रुंदीकरण झाले होते. मात्र, वाढलेली वाहतूक लक्षात घेता आता पुन्हा एकदा या रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे. मात्र, कुंभमेळा विकास प्राधिकरणने या प्रस्तावाला अद्याप मंजुरी दिलेली नाही.
हा रस्ता सापुतारा ते पिंपळगाव व तेथून ओझर ते शिर्डी या रस्त्याला जोडणारा असल्याने गुजरातमार्गे शिर्डीला जात असलेल्या भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तसेच शिर्डीला आलेल्या भाविकांना पंचवटीत जाण्यासाठीही हा रस्ता सर्वात जवळचा आहे. याशिवाय नाशिक-शिर्डी या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास हा पर्यायी मार्ग म्हणूनही वापरला जाऊ शकतो.
या सर्व बाबींचा विचार करून मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात हा रस्ता मंजूर करून त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते.
दरम्यान मागील सिंहस्थानंतर समृद्धी महामार्ग झाल्याने नाशिकला जाण्यासाठी भाविकांना शिर्डी-नाशिक या पारंपरिक मार्गाला नवीन सक्षम पर्याय मिळाला आहे. यामुळे शिर्डी नाशिक या मार्गाला नवीन पर्यायाचा कुंभमेळा विकास आराखडा तयार करताना विचार करण्यात आला नाही. तसेच मागील सिंहस्थात निफाड व सिन्नरच्या आमदारांनी पाठपुरावा केला. तसा पाठपुरावा यावेळी लोकप्रतिनिधींनीही केला नाही. यामुळे सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखड्यातून हा मार्ग निसटला आहे.
शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी अथवा शिर्डीहून नाशिकला येणाऱ्या भाविकांना पर्यायी मार्ग मिळाला असला, तरी निफाड, सिन्नर तालुक्यातील नागरिकांना नाशिकला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने त्याचे रुंदीकरण होण्याची होण्याची प्रतीक्षा आहे.