

मुंबई (Mumbai): वाढवण बंदर केवळ पालघर जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्य आणि देशाच्या जलद आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
या बंदराशी संलग्न पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, त्यातील वाढवण बंदर ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडमार्गाचे (फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प) काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू असून १४,००० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. राज्याच्या महत्त्वाकांक्षी बंदर विकास उपक्रमाला गती देण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या प्रस्तावित जोडमार्गाची लांबी साधारण 104–105 किलोमीटर असून, त्यासाठी 3+3 अशा सहा लेनची रचना केली जात आहे.
महामार्गाची प्रस्तावित रुंदी 100 मीटर तर बोगद्यांची रुंदी 80मीटर इतकी असेल. या मार्गावर 100 किमी प्रति तास वेगाने प्रवास करता येणार असून, प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सध्याच्या 183 किलोमीटर अंतराच्या तुलनेत नवीन जोडमार्गामुळे प्रवास 104 किलोमीटरपर्यंत होणार असून यात सुमारे 78 किलोमीटरची बचत होईल. चार ते पाच तासांचा प्रवास कमी होऊन तो एक ते दीड तासात पूर्ण होईल.
प्रस्तावित महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या भागांतून जाणार आहे. एकूण ६५ गावे या मार्गात समाविष्ट असून या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्याचे काम सुरू असून १४,००० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
हा प्रकल्प संबंधित सर्व स्थानिक शेतकरी बांधव, भूमिपुत्र तसेच त्या भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच तयार केला जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात आमदार महेश सावंत, मनिषा चौधरी, राहुल पाटील, योगेश सागर, रईस शेख, हिरामण खोसकर यांनी फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला त्यावर, मंत्री भुसे यांनी ही माहिती दिली.