

नाशिक (Nashik): राज्य सरकारने २०२३ मध्ये नवीन वाळू धोरण जाहीर केल्यापासून नाशिक जिल्ह्यातील वाळू ठेक्यांच्या लिलाव प्रक्रियेस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून येत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाबाबत ऑक्टोबरमध्ये राबवलेल्या ई टेंडरला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने अखेर त्यांनी फेरटेंडर प्रसिद्ध केले आहे.
यानुसार वाळूघाट लिलावासाठी इच्छुक असलेल्यांकडून ई-लिलाव प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार कळवण, बागलाण, देवळा व मालेगाव या तालुक्यांमधील गिरणापात्रातील वाळूघाटांच्या या ई लिलावासाठी ई टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. पाच जानेवारी २०२६ रोजी ई लिलाव होणार आहे.
राज्य सरकारने २०२३ मध्ये नवीन वाळू धोरण जाहीर केले. त्यानुसार वाळूघाट, वाळूचे दर निश्चित करण्यात आले. मात्र, तेव्हापासून जिल्हाधिकरी वाळूघाट लिलावांना ठेकेदारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच काही वाळू घाटांच्या लिलावांना स्थानिक ग्रामपंचायतींचा विरोध असल्याचेही दिसून आले आहे.
यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने ऑक्टोबर २०२५ मध्ये गिरणापात्रातील दहा ठिकाणांवरील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी ई टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यावेळी या दहा वाळू घाटांपैकी केवळ दोन घाटांसाठी प्रतिसाद मिळाला होता.
त्यात एका घाटासाठी एक व दुस-या घाटासाठी पाच टेंडर आले होते. त्यामुळे केवळ एका वाळू घाटासाठी आलेले टेंडर उघडण्यात आले. मात्र, त्यातही कागदपत्र अपूर्ण होते. यामुळे ती टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा नव्याने टेंडर प्रसिद्ध केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केल्यानुसार गिरणा नदी पात्रातील दहा ठिकाणच्या वाळू घाटांचे लिलाव प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात कळवण तालुक्यातील येसगाव व पाटणे व बागलाण तालुक्यातील नरडाणे व आघार खर्द, देवळा तालुक्यातील धांद्री व लोहोणेर तसेच मालेगाव तालुक्यातील महालपाटणे, जायखेडा, नाकोडे व असोली या ग्रामपंचायत क्षेत्रातील वाळूघाटांचा समावेश आहे.
या सर्व दहा वाळूघाटांवर मिळून ३३ हजार २१० ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी ई लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.
प्रक्रियेचे वेळापत्रक असे
२५ डिसेंबर : दुपारी ११.०० वाजता ई-निविदा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणे सुरू.
२६ डिसेंबर: दुपारी ११.०० ला प्री-बिड मीटिंग ऑनलाइन/ऑफलाइन.
३१ डिसेंबर: सायंकाळी ०५.०० वाजता ई-टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत.
१ जानेवारी: सायंकाळी ०५.३० ला ई-टेंडर (तांत्रिक लिफाफा) उघडण्यात येईल.
२ जानेवारी: ई-निविदा तांत्रिक पडताळणीनंतर आर्थिक लिफाफा उघडण्यात येईल.
५ जानेवारी: ई-ऑक्शन (ई-लिलाव) प्रक्रिया सकाळी ११.०० पासून दुपारी १.०० पर्यंत सुरू राहील.