Nashik ZP: जिल्ह्यातील 'या' 3 महत्त्वाच्या ठिकाणांच्या विकासाची जबाबदारी झेडपीकडे

Nashik ZP
Nashik ZPTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थाच्या कामांना वेग आला आहे. या दोन ठिकाणांशिवाय नाशिक जिल्ह्यातील सर्वतीर्थ टाकेद, कावनई व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ या ठिकाणांचाही विकास केला जाणार आहे.

यामुळे सिंहस्थानिमित्त आलेल्या भाविकांना या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात येणार असून या ठिकाणांकडे जाणारे सर्व रस्त्यांसाठी सिंहस्थ आराखड्यातून निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय त्या ठिकाणी असलेले कुंड, मंदिर यांचे पुनरुज्जिवन केले जाणार आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन वाढून तेथील स्थानिकांना यामुळे रोजगार मिळू शकणार आहे.

Nashik ZP
Nashik Ring Road: केंद्राकडून मान्यता 48 किमीची; टेंडर मात्र 66 किमीचे

सिंहस्थ कुंभमेळा म्हटले की प्रामुख्याने नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणांचाच उल्लेख होतो. या दोन ठिकाणी होणा-या अमृतस्नानासाठी देशभरातून आखाड्यांचे साधू येत असतात. मात्र, ठिकाणांच्या व्यतिरिक्तही जिल्ह्यात सप्तश्रृंग गड, सर्वतीर्थ टाकेद, कावनई व चक्रतीर्थ ही ठिकाणे आहेत. त्यातील सप्तश्रृंगी देवी हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ आहे.

यामुळे या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास निधीतून अनेक कामे होत असतात. त्या तुलनेत इतर ठिकाणांचा विकास झालेला नाही. यामुळे कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांनी या तीन ठिकाणांचे मंदिर, कुंड यांचे पुरातत्व विभागाप्रमाणे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून ती जबाबदारी नाशिक जिल्हा परिषदेवर सोपवली आहे.

या तीन ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढेल व पर्यटनाला चालना मिळेल यासाठी काय करता येईल,याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर त्या कामांसाठी कुंभमेळा प्राधिकरणकडून निधी मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.

Nashik ZP
Nashik: रिंगरोडसाठी 116 कोटींचे पहिले टेंडर प्रसिद्ध; आधी 2 पूल उभारणार

सर्वतीर्थ टाकेद

सर्वतीर्थ टाकेद येथे रामायणकाळात रावण व जटायू यांचे युद्ध झाले असून त्या युद्धात जखमी जटायू याला श्रीराम व लक्ष्मण यांनी तीर्थ देऊन अखेरचा निरोप दिला, असा रामायणात उल्लेख आहे. याठिकाणी प्रत्येक महाशिवरात्रीला यात्रा भरते. येथील कुंडात स्नानासाठी भाविक येत असतात. हे ठिकाण पट्टा किल्ल्यापासून जवळ असून येथे सिंहस्थानिमित्त सुधारणा केल्यास तेथील पर्यटनास चालना मिळू शकते. केंद्र सरकारच्या रामायण सर्किटमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे.

कावनई

इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी कावनई हे तीर्थ आहे. या ठिकाणी कपील मुनी यांनी आईच्या मुक्तीसाठी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. यामुळे याला मातृतीर्थ असेही म्हटले जाते. या ठिकाणी चिनी प्रवाशी युऑन शाँग याने भेट दिल्याचे सांगितले जाते. या ठिकाणच्या तीर्थस्थळाचे पुनरुज्जीवन झाल्यास या भागातील पर्यटनात वाढ होऊ शकते.

Nashik ZP
बापरे! नाशिक महापालिकेने खड्डे बुजवण्यावर उडवले 225 कोटी

चक्रतीर्थ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे या गावात गोदावरीच्या पात्रात हे कुंड आहे. भगवान विष्णूने सुदर्शन चक्र मारून या कुंडाची निर्मिती केल्याचे पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत. गोदावरी ही ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावत असली तरी ती वाहत्या स्वरुपात याच चक्रतीर्थावर दिसते. तेथे या कुंडातून बाराही महिने गोदावरीचा प्रवाह वाहत असतो.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थात गोसावी व बैरागी या आखाड्यांच्या साधुंमध्ये शाहीस्नानाच्या क्रमावरून अठराव्या शतकात मोठी लढाई झाली होती. त्यावेळी बैरागी आखाड्यांच्या साधुंनी त्र्यंबकेश्वर सोडले व पुढच्या पर्वणीत त्यांनी या चक्रतीर्थ येथे शाहीस्नान केल्याच्या ऐतिहासिक नोंदी असल्याचे सांगितले जाते.

हे ठिकाण दुर्लक्षित असून या सिंहस्थात त्र्यंबक-नाशिक रस्त्यापासून चक्रतीर्थापर्यंत कॉंक्रिटचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच आता कुंभमेळा प्राधिकरणाकडूनही या परिसराचा विकास, कुंडावर स्नान करता येईल, अशी व्यवस्था उभारली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com