

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांमध्ये सोईसुविधा उभारण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने प्रत्येक आखाड्याला या कामांसाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे निधी मंजूर केला आहे.
पुढच्या टप्प्यात या आखाडयांमध्ये येणाऱ्या साधुमहंतांना सुविधा पुरवण्यासाठी गरजेनुसार आणखी निधी दिला जाईल, असे कुंभमेळा प्राधिकरणामधील सूत्रांकडून सांगण्यात आले. तपोवनात वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमींप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या काही राजकीय विरोधकांनीही वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची कोंडी झाली होती. यात सिंहस्थाची कामे पुढे नेताना साधुमहंतांची मर्जी कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आखाड्यांना पहिल्या टप्प्यात हा निधी मंजूर केला असून गरज भासल्यास आणखी निधी दिला जाणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यानिमित्ताने कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, या प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २५ हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
सिंहस्थात आखाडे व त्यांचे साधु महंत यांना अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे सिंहस्थासाठी हजारो कोटी रुपये खर्च करणार असाल, तर आखाड्यांमधील साधु महंत व त्यांच्याशी संबंधित भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रत्येक आखाडानिहाय पाच कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी केली होती.
दरम्यान नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीवरून वातावरण तापल्यानंतर साधु महंत यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न कुंभमेळा प्राधिकरणाने केला. त्यासाठी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील १३ आखाड्यांमध्ये सोईसुविधा उभारण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यातील दहा आखाडे त्र्यंबकेश्वरला, तर नाशिकला तीन आखाडे अमृतस्नान करतात. हा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात येतो. यामुळे सुविधांच्या अभावी उत्तरेतील साधुमहंत पावसाळ्यात या सिंहस्थास येण्यास अनुत्सुक असतात. जे येतात त्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी पक्के काम करून सुविधा उभारण्यावर आखाड्यांचा भर असतो. मात्र, त्यांना मर्यादा येत असल्याने २०१५ च्या सिंहस्थामध्ये प्रशासनाने सर्व आखाड्यांना त्यांच्याकडील उपलब्ध जागेनुसार निवारा शेड बांधून दिले होते.
तसेच स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, अंतर्गत रस्ते आदी सुविधा उभारून दिल्या होत्या. यामुळे त्या सिंहस्थात साधुमहंतांची संख्या वाढली होती. यावेळी आखाड्यांमध्ये आता नवीन बांधकाम करण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही. यामुळे सध्या असलेल्या वास्तुंची दुरुस्ती करणे, आखाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, आखाडा परिसरात काँक्रिटीकरण करणे, स्वच्छतागृहांची डागडुजी करणे आदी कामांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी आखाड्यांप्रमाणेच त्यांच्याशी संबंधित अनेक महंतांचे आश्रम आहेत. या आश्रमांना त्यांच्या जागेत मागील सिंहस्थात निवाराशेड उभारून दिले होते. यावेळीही त्यांना इतर सुविधा उभारून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गरज पडल्यास पुढील टप्प्यात आणखी निधी दिला जाणार आहे.