

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोड, द्वारकाचौक, घोटी-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग, रामकाल पथ आदी प्रकल्पांना निधी मंजूर केल्यानंतर आता नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील आणखी तीन हजार कोटींच्या १६ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पांसाठी प्रत्येकी दहा टक्के प्रमाणे ३०६ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी बिनव्याजी भांडवली अर्थसहाय्य या योजनेतून मंजुरी दिली आहे. त्यातून महाराष्ट्र सरकारला ५० वर्षांसाठी हा निधी बिनव्याजी कर्जाच्या स्वरुपात मंजूर केला आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यासाठी वेगवेळ्या विभागांनी त्यांचे आराखडे तयार केले असून त्यातील जवळपास २३ हजार कोटींच्या कामांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यातील काही कामे केंद्र सरकार व काही कामे राज्य सरकारच्या निधीतून होणार असून काही कामे ही केंद्र व राज्य दोघे संयुक्तपणे करणार आहे.
नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जवळपास आठ हजार कोटींचा रिंगरोड मंजूर करण्यात आला आहे. त्यातील बांधकामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून राज्य सरकार भूसंपादन करणार आहे. त्याचप्रमाणे द्वारकाचौक येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी केंद्राच्या रस्ते विकास मंत्रालयाकडून २१७ कोटी रुपयांचा ग्रेड सेपरेटर मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय पंचवटीत रामकाल पथसाठी १०० कोटी रुपये, घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गासाठी १३०० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६ याअंतर्गत १६ कामांसाठी निधी मंजूर केला आहे. ही कामे साधारण तीन हजार कोटी रुपयांची असून त्या कामांसाठी केंद्र सरकारने ३०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नगरविकास विभागाने प्रत्येक कामासाठी साधारण दहा टक्के निधी वितरित केला आहे.
केंद्र सरकारने हा निधी राज्य सरकारला भांडवली गुंतवणुकीकरिता ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्जाच्या स्वरुपात मंजूर केला आहे. कुंभमेळा प्राधिकरणने या कामांसाठी निधीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर राज्य सरकारने १९ डिसेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारला पाठवला होता. त्यानंतर राज्य सरकारने ९ जानेवारी २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची यादी पाठवली होती.
त्यातील १६ कामांना केंद्र सरकारने २४ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आहे. त्यातील ३०६ कोटी रुपये निधी राज्य सरकारने संबंधित १६ कामांसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणकडे कामनिहाय वितरित केला आहे.
केंद्र सरकारने निधी मंजूर केलेली कामे
- त्र्यंबकेश्वरमधील पाणी पुरवठा योजना (१२.८४ कोटी रुपये)
- त्र्यंबकेश्वर तुपादेवी फाटा-तळवाडे-रोहिले- कोचरगाव-उमराळे-दिंडोरी-पालखेड- पिंपळगाव बसवंत मार्ग (२१.५ कोटी)
- हिरवेपिंपळपाडा-मुरुंबी, आडगाव- खारवळ-वेळुंजे- आंबोली पार्किंग (५.२ कोटी)
- त्र्यंबकेश्वर पालिका हद्दीत भूमिगत इलेक्ट्रिक तारा टाकण्याचे काम (६.७८ कोटी)
- गोदावरी -कपिला संगमाच्या वरच्या भागात उजव्या तीरावर घाट बांधणी (१२ कोटी)
- ओढा येथे रामघाट बांधणे (११ कोटी)
- दसक शिवारात गोदावरीच्या उजव्या तीरावर घाट बांधणी (२० कोटी)
- नांदूर येथे गोदावरीच्या डाव्या तीरावर घाटबांधणी (२० कोटी)
- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या दोन्ही तीरांवर घाटबांधणी (५० कोटी)
- त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी बारमाही वाहती करण्यासाठी गौतमी गोदावरी धरणातून उपसा सिंचन योजना राबवणे (६५ कोटी)
- त्र्यंबकेश्वर दर्शन पथ उभारणी (६.८ कोटी)
- त्र्यंबकेश्वर पालिका हद्दीत १२ किलोमीटर लांबीचे सिमेंट रस्ते उभारणे (१८.२ कोटी)
- नाशिकमधील खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नल या त्र्यंबक रस्त्याचे काम करणे (८ कोटी)
- भरवीर-निनावी- पिंपळगाव- साकूर फाटा- आधारवड-टाकेद या रस्त्याचे नुतनीकरण (११.९ कोटी)
- ढकांबे-आंबे दिंडोरी- जउळके राज्य मार्गाचे नुतनीकरण (१६.३ कोटी)
- पेठ-तोरंगण- हरसूल-वाघेरा-आंबोली- त्र्यंबकेश्वर- पहिने- देवगाव-घोटी मार्ग रुंदीकरण (२०.५ कोटी)
Key Points Summary
• सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी 16 नवीन प्रकल्प मंजूर
• सुमारे ₹3000 कोटी खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प
• केंद्र सरकारकडून ₹306 कोटी निधी वितरित
• निधी 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज स्वरूपात
• घाट, रस्ते, पाणीपुरवठा आणि सिमेंट रस्ते प्रकल्पांचा समावेश
• नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होणार