

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असतानाच महापालिकेने आणखी ३७ रस्त्यांच्या कामांसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, मजबुतीकरण, पुनर्पृष्ठीकरण तसेच नवीन रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. विशेषतः गॅस पाइपलाइन आणि अन्य सेवांसाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या चरांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. या ३७ कामांची एकत्रित अंदाजित किंमत १०८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपये आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रमुख २८ रस्त्यांची कामे सुरू असतानाच नाशिक महापालिकेने शहरातील इतर ३७ रस्त्यांची रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, मजबुतीकरण आणि नव्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामांमध्ये शहरातील विविध भागांत गॅस पाइपलाइन तसेच अन्य सेवांसाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या चरांची दुरुस्ती करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या टेंडरमधील ३७ कामांची एकत्रित अंदाजित किंमत १०८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपये आहे.
नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रमख २८ रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. यारस्त्यांशिवाय शहरातील इतर रस्त्यांवर महानगर नॅचरल गॅस लिमिटेडच्या पाईपलाईनसह इतर पाईपलाईनसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. सिंहस्थामुळे २८ रस्त्यांवर केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित रस्त्यांवर केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी रस्ते तयार करण्यासाठी संबंधित कंपन्यांनी महापालिकेकडे तोडफोड शुल्क जमा केलेले असल्याने महापालिकेने त्या निधीतून शहरातील ३७ रस्त्यांच्या कामांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील अशा चरांच्या दुरुस्तीसाठी सर्वाधिक ८ कोटी २ लाख ४१ हजार खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे उपनगर व मातोश्रीनगर परिसर, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग १४, १५, १६, २३ व ३०, नवीन नाशिकमधील प्रभाग ३१, साईनाथनगर-मिल्लतनगर-ममतानगर, राजीवनगर आदी भागांतील खोदकाम केलेल्या रस्त्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे.
उपनगर नाका ते इंगळेनगर सिग्नलदरम्यान मागासवर्गीय वसाहतीलगतच्या कालवा रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याचे कामही प्रस्तावित आहे. या कामासाठी ७ कोटी ९९ लाख १४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पंचवटी, नाशिक रोड, सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील जुन्या डांबरी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल, तसेच सातपूर एमआयडीसी परिसरात नवीन डांबरी रस्ते तयार करण्याची कामेही या पॅकेजमध्ये आहेत.
पंचवटी विभागात आडगाव शिवार, नांदूर आदी भागांतील विविध कॉलनी रस्त्यांसाठी डब्ल्यूबीएम कामे तसेच आडगाव-भगूर रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण केले जाणार आहे. मखमलाबाद व पेठ रोड परिसरातील विविध रस्त्यांचा विकास, तसेच शिखरेवाडी, पेंढारकर कॉलनी, जेल रोड परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व पुनर्पृष्ठीकरणाची कामे प्रस्तावित आहेत.
नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग १२ मध्ये आयटीआय चौक ते इंडियन ऑइल पंप, महात्मानगर, वॉटर टँक तसेच अन्य रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण केले जाणार आहे. मखमलाबादमधील विविध ठिकाणी नवीन डब्ल्यूबीएम रस्ते आणि बीटी रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण, तर सातपूरच्या विविध प्रभागांत डांबरी रस्त्यांच्या निर्मितीची कामे केली जाणार आहेत.
नाशिक पूर्व विभागातील एसबीआय कॉलनी, एन.के. नगर, तोरणा सोसायटी, व्यंकटेश कॉलनी आदी भागांतील विद्यमान काँक्रीट रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण व डांबरीकरण करण्याचे कामही प्रस्तावित आहे. नाशिक रोड विभागातील वडनेर गेट व परिसरातील विविध रस्ते, जयंतनगर, भगवा चौकातील डीपी रस्ते आणि धारबळे मळा रस्त्याचे डांबरीकरण व पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे.
नाशिक रोड विभागातील नव्याने विकसित झालेल्या भागांमध्ये रस्ते बांधणे, पंचवटीतील निसर्गनगर, एकतानगर व परिसरात डांबरी रस्ते तयार करणे, तसेच नवीन नाशिकमधील प्रभाग २९, २८ (अ) आणि २८ (ड) मधील विविध रस्त्यांचे चर दुरुस्ती व पुनर्पृष्ठीकरणाची कामेही या योजनेत आहेत.
Key Points
गॅस पाइपलाइन व अन्य सेवांसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या चरांची दुरुस्ती
विद्यमान डांबरी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल
रस्त्यांचे डांबरीकरण व पुनर्पृष्ठीकरण
जुन्या रस्त्यांचे मजबुतीकरण
नवीन डांबरी रस्त्यांची निर्मिती
डब्ल्यूबीएम रस्त्यांची निर्मिती
डीपी रस्त्यांचा विकास
नव्याने विकसित भागांमध्ये रस्ते बांधकाम
विद्यमान काँक्रीट रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण