Nashik: महापालिकेचा दुटप्पीपणा उघड; म्हसरूळ-वरवंडी रस्त्यासाठी DSR, तर रस्ते दुरुस्तीसाठी स्टार रेट

नाशिक महापालिका इमारत
NMC, NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणने मंजुरी दिलेल्या म्हसरूळ ते वरवंडी गाव विमानतळ रस्त्याच्या विकासासाठी नाशिक महापालिकेने २० कोटी ६४ लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने म्हसरूळपासून वरवंडीपर्यंतचा हा रस्ता विकसित करून विमानतळाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या डांबरी रस्त्यांसाठी डांबराला स्टाररेट लागू करण्यासाठी पुढाकार घेणा-या नाशिक महापालिका प्रशासनाने या रस्त्यासाठी मात्र जिल्हा अथवा राज्य दरसूचीतील (डीएसआर अथवा एसएसआर) दर डांबरासाठी लागू राहणार असल्याचे टेंडरमध्ये स्पष्ट केले आहे. यामुळे महापालिका हद्दीत एकाच प्रकारच्या कामासाठी निधी कोणाचा आहे, या कारणावरून स्टार रेट की डीएसआर दर असा भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महापालिकेचा निधी असल्यावर स्टाररेटशिवाय काम न करणा-या ठेकेदारांना या रस्त्याचे काम डीएसआर दरानुसार कसे परवडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक महापालिका इमारत
Nashik Roads: नाशिक शहरातील रस्ते 'खड्ड्या'त गेले तरी महापालिकेला रम्बलर्स बसविण्याची घाई! 10 कोटींचे कंत्राट

ओझर विमानतळाकडे जाण्यासाठी नाशिकमधून मुंबई आग्रा महामार्गाने प्रमुख रस्ता आहे. मात्र, सिंहस्थाच्या गर्दीच्या वेळी विमानतळाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असावा, या हेतुने कुंभमेळा प्राधिकरणने म्हसरूळ वरवंडी गाव विमानतळ रस्ता मंजूर केला आहे. या रस्त्याचा काही भाग नाशिक महापालिका हद्दीत तर काही भाग ग्रामीण भागात येतो. या रस्त्याचे काम नाशिक महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

नाशिक महापालिकेतने या २०.६४ कोटींच्या कामांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. सध्या नाशिक महापालिकेत डांबराला स्टाररेट देण्यावरून वाद आहेत. ठेकेदारांनी डांबराला स्टाररेट लागू केल्याशिवाय रस्ते दुरुस्ती करण्यास नकार दिला. त्यामुळे नाशिककरांना गेले काही महिन्यांपासून खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. तरीही ठेकेदारांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांचे कार्यारंभ आदेश स्वीकारले नाहीत व महापालिका प्रशासनानेही ठेकेदारांची पाठराखण केल्याचे चित्र तयार झाले.

अखरे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी डांबराला स्टाररेट लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शहरातील रस्ते दुरुस्ती सुरू झाली. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या महासभेत डांबर, स्टील व सिमेंट यांना स्टाररेट लागू करण्यास मान्यता देणारा ठराव मंजूर केला. त्या ठरावात हे स्टाररेट केवळ नाशिक महापालिकेच्या निधीतून केल्या जाणा-या कामांसाठी लागू राहतील, असेही स्पष्ट केले आहे. यामुळे महापालिकेचा निधी असल्यास स्टाररेटशिवाय कामे न करणा-या ठेकेदारांना इतर संस्थांचा निधी असल्यास डीएसआरनुसार काम करण्यास कसे परवडते, असा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिक महापालिका इमारत
Nashik Construction TDR: नाशिकमध्ये रस्ते, जलवाहिनी आणि मलनिस्सारणाची जबाबदारी बिल्डरांवर; बदल्यात मिळणार बांधकाम टीडीआर

९२ हजार ६४० चौरस मीटर डांबरीकरण
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या टेंडरमधील ‘बी’नुसार या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विविध स्तरांवर कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये टॅक कोट, प्राइम कोट, बिटुमिनस मॅकॅडम, डेंस बिटुमिनस मॅकॅडम (DBM) आणि बिटुमिनस काँक्रीट (BC) यांचा समावेश आहे. टेंडरच्या अंदाजपत्रकानुसार ९२ हजार ६४० चौरस मीटर क्षेत्रासाठी टॅक कोट, तर १९ हजार १४० चौ.मी. क्षेत्रासाठी प्राइम कोट प्रस्तावित आहे.

याशिवाय बिटुमिनस मॅकॅडमच्या विविध मिश्रणांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. ३.५० टक्के बिटुमेन असलेल्या बिटुमिनस मॅकॅडमसाठी सुमारे १,४६५.२० घनमीटर, ४.५० टक्के बिटुमेन असलेल्या डेंस बिटुमिनस मॅकॅडमसाठी १,९८० घनमीटर, तर ६.२५ टक्के बिटुमेन असलेल्या बिटुमिनस काँक्रीटसाठी १,३२० घनमीटर काम प्रस्तावित आहे. टेंडरमधील अटींमध्ये महापालिकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की, २७ सप्टेंबर २०१८च्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कामासाठी बदलती किंमत स्टार रेट कोणतीही तरतूद नाही. यामुळे ठेकेदारांना इतर निधीतील कामे डीएसआर (जिल्हा दरसूची) नुसार करणे परवडत असेल, तर महापालिकेच्या निधीतील कामे का परवडत नाही.

तसेच महापालिका इतर निधीतील कामांची किंमत डीएसआरनुसार करीत असेल, तर स्वनिधीतील कामे का त्याच दराने करून घेत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे स्टाररेट लागू करण्यामागे प्रशासन व ठेकेदार यांचे संगनमत असल्याच्या नगरसेवकांच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे दिसत आहे.

नाशिक महापालिका इमारत
Nashik NMC: नाशिक महापालिकेच्या टेंडरमध्ये होणार मोठा बदल; डांबरासह सिमेंट, स्टीललाही ‘स्टार रेट’चा प्रस्ताव

डांबराच्या दराबाबत डीएसआरचा संदर्भ नाही
टेंडरमधील डांबरीकरणाच्या विविध कामांसाठी महापालिकेने स्वतंत्र अंदाजपत्रकीय दर निश्चित केले आहेत. त्यात डांबराचे थर वापरताना प्रत्येक ठिकाणी व्हीजी-३० या दर्जाच्या डांबराचा उल्लेख स्पष्ट नमूद आहे. मात्र या प्रमुख डांबरासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा कोणत्या वर्षाच्या जिल्हा अथवा राज्य दरसूचीचा आधार घेतला आहे, याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. व्हीजी-३० बिटुमेनचा ग्रेड आहे.

उष्ण हवामान आणि जास्त वाहतूक असलेल्या रस्त्यांसाठी भारतात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तापमान वाढल्यानंतरही रस्त्याच्या डांबरी थराला आवश्यक स्थिरता मिळावी आणि रस्त्यावर चाकांचे ठसे, किंवा डांबर सरकण्याचे प्रकार कमी व्हावेत, यासाठी व्हीजी-३० उपयुक्त ठरतो. 

Tendernama
www.tendernama.com