खानदेशसाठी Good News: नार-पार-गिरणा नदीजोडच्या 4 हजार कोटींच्या टेंडरला ग्रीन सिग्नल

जलसंपदा विभागाच्या टेंडर प्रक्रिला शासन स्तरावरील समितीची मान्यता
River Linking Project
River Linking ProjectTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक - जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या नार - पार - गिरणा नदी जोड प्रकल्पाची जवळपास ४४ वर्षांची मागणी दृष्टीपथात आली आहे. जलसंपदा विभागाने यापूर्वी राबवलेल्या टेंडर प्रक्रिला शासन स्तरावरील समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

River Linking Project
जलयुक्तच्या कामांमध्ये नाशिक झेडपी पिछाडीवर; 16 कोटीचे फेरटेंडर आणखी किती लांबणार?

यामुळे लवकरच या नदीजोड प्रकल्पासाठी कार्यारंभ आदेश दिले जाणार आहे. या प्रकल्पातून नाशिक व जळगाव जिल्ह्याला १०.७६ टीएमसी पाणी सिंचन व पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या कामाच्या टेंडरला मान्यता मिळाल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. जलसंपदा विभागाने डिसेंबर २०२५ मध्ये नार-पार-गिरणा या नदीजोड प्रकल्पाचे ४११६ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले होते.

नार-पार-गिरणा या नदीजोड प्रकल्पाला २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पातून नार आणि पार या पश्चिम वाहिनी नद्यांमधील १०.७६ टीएमसी पाणी गिरणा नदीत वळवले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील पेठ व सुरगाणा तालुक्यातून वाहणाऱ्या  नार, पार औरंगा व अंबिका या नद्यांचे पाणी पश्चिमेकडे अरबी समुद्रात वाहून जाते. ते पाणी पूर्वेकडील गिरणा नदीपात्रात वळवल्यास त्याचा नाशिक व जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाला फायदा होईल, असा सर्व्हे नाशिकमधील हरिभाऊ जाधव यांनी १९८२ मध्ये केला होता. तेव्हापासून नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी होती.

River Linking Project
नाशिक ZP सोलर घोटाळा : अंदाजपत्रक ‘कॉपी-पेस्ट’, तांत्रिक मान्यता नियमबाह्य

नार, पार, औरंगा आणि अंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्यांमधील अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात टाकले जाणार आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या योजनेच्या टेंडरला सरकारच्या उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाल्याने आता प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश हा अंतिम टप्पा उरला आहे. यामुळे आता या प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी डिसेंबर २०२५ मध्ये ४११६ कोटींच्या कामांचे टेंडर प्रसिद्ध केल्यानंतर मागील चार महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शासनाच्या समितीने या टेंडरला मंजुरी दिली आहे. या टेंडरमध्ये भूसंपादन, पुनर्वसन, प्रकल्पाचा आराखडा आणि बांधकाम आदींचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात नऊ धरणे बांधली जातील व त्या धरणांमधून पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत सोडले जाईल. हे पाणी धरणे, बोगदे आणि कालव्यांच्या माध्यमातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आणले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात धरणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा समावेश आहे.  

दुसऱ्या टप्प्यातील टेंडरमध्ये कालवा, पाइप वितरण जाळे आणि गिरणा उपखोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक बाबींच्या कामांचा समावेश असणार आहे.

River Linking Project
Nashik: का रखडले एकदरे-वाघाड, गारगाई-देव नदीजोड प्रकल्प?

टप्पा दोनचाही अभ्यास सुरू
नार-पार- गिरणा या नदीजोड जोड प्रकल्पातून १०.७६ टीएमसी पाणी अडवले जाणार आहे. त्यापैकी साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यासाठी वापरले जाणार आहे. उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिकांसाठी राखीव ठेवले जाईल. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरणांच्या परिसरातील ७,१७४ हेक्टर, असे ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

तापी खोरे विकास महामंडळाने नार पार गिरणा या नदीजोड प्रकल्पातून चनकापूर कालव्याच्या २६ किलोमीटर कामाची ५६.४७ कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवली आहे. मात्र, आधी नारपार योजनेचे काम करा, नंतर कालव्याचे काम करा, अशी भूमिका घेत लाभधारकांनी त्या कामाला विरोध केला होता.  मात्र, आता या टेंडरला मंजुरी मिळाल्याने नार-पार नदीजोड प्रकल्प व चणकापूर कालवा ही दोन्ही कामे एकाचवेळी सुरू होऊ शकणार आहेत.

याबरोबरच या प्रकल्पाच्या  टप्पा-२ बाबतही सरकार सकारात्मक असून जलसंपदा विभाग त्याचा अभ्यास करत आहे. नार-पार टप्पा दोनमधूनन सुमारे २०.६६ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, असेही शिक्षणमंत्री भुसे यांनी म्हटले आहे.

Tendernama
www.tendernama.com