
पुणे, ता. १७ : पुणे शहरात सेवा वाहिन्या टाकल्यानंतर रस्ते दुरुस्त करताना ठेकेदारांकडून (Contractors) नियमानुसार काम केले जात नसल्याचे जागोजागी रस्ते खचण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार धायरी येथे समोर आला असून, समान पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला महापालिकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांत सुमारे १२०० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले आहेत. जलवाहिनीसाठी रस्ता खोदल्यानंतर मशरूम टाकून, व्यवस्थित दबाई करून त्यानंतर सिमेंट काँक्रिटीकरणाने रस्ता पूर्ववत करणे आवश्यक आहे.
रस्ते दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नसल्याने हे काम कंपनीकडून काढून ते पथ विभागाकडे देण्याचा विचारही प्रशासनाने केला होता. पण खोदकामानंतर रस्ते दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार कंपनीने करणे हा त्या टेंडरचा भाग होता, त्यासाठी टेंडरमध्ये खर्चही पकडला आहे. त्यामुळे हे काम काढून न घेता त्यावर पथ व पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदारावर लक्ष देणे योग्य राहील, असा निर्णय घेण्यात आला होता.
धायरी येथे डीएसके विश्व रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकली. त्यानंतर हा रस्ता पूर्ववत केला. पण वाहनांच्या वर्दळीमुळे खोदकाम केलेल्या रस्त्याचा भाग खचत आहे. सावित्री गार्डनसमोर रस्ता खचून सुमारे १० फूट खोल खड्डा पडला. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर ठेकेदाराने हे काम व्यवस्थित केले नसल्याने भगदाड पडल्याचे समोर आले आहे.
अर्धवट काम करून बुजविला खड्डा
वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ते डीएसके विश्व टाकीदरम्यान ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली आहे. सावित्री गार्डनजवळ जलवाहिनी टाकताना नाल्याच्या शेजारी पावसाळी गटार आहे. त्याचा अडथळा आल्याने ती तोडून जलवाहिनी टाकली. पण दुरुस्तीचे काम अर्धवट ठेवले. त्यामुळे लाकडी फळी टाकून त्यावर भराव भरून रस्ता डांबरी केला.
या अर्धवट कामामुळे माती खचून मोठा खड्डा पडला. सुदैवाने याठिकाणी अपघात झाला नाही. हा रस्ता अनेक ठिकाणी खचल्याने भविष्यात तेथेही खड्डे पडण्याची शक्यता आहे.
या कारणांनी पडतात खड्डे
१) शहरातील रस्त्यांना डक्ट नसल्याने सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागतात
२) काम झाल्यानंतर खोदलेला भाग व उर्वरित रस्ता समपातळीत आणणे आवश्यक
३) खड्डा बुजविताना मुरूम, खडी टाकून दबाई करणे आवश्यक
४) दबाई झाल्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून त्याच्या सीमा सील करणे आवश्यक
५) या कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून ठेकेदार पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट कामे करतात
निकृष्ट काम केल्याने संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, ही रक्कम त्याच्या बिलातून वळती केली जाईल. जलवाहिनी टाकल्यानंतर चुकीच्या पद्धतीने काम झाले असल्यास नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावे, त्यावर त्वरित कारवाई करून रस्ता पुन्हा दुरुस्त केला जाईल.
- श्रीकांत वायदंडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग