
मुंबई (Mumbai) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुण्याजवळील सुप्रसिद्ध रांजणगाव गणपती येथे धक्कादायक १८ कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. (Land Scam In Ranjangaon News)
या घोटाळ्यात रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या विद्यमान अध्यक्षा स्वाती पाचुंदकर आणि त्यांचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने पाचुंदकर दाम्पत्याला दणका दिला असून, स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असलेल्या स्वाती पाचुंदकर यांनी रांजणगावच्या सरपंच असताना, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सरकारी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून ७२ गुंठे शासकीय जमीन सासऱ्यांच्या नावे केली. २००८-०९ मध्ये झालेल्या या बेकायदेशीर हस्तांतरणातून त्यांनी १८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
या जागेवर त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करून दुकाने भाड्याने दिली, तसेच उरलेल्या जागेत भंगाराचे गोदाम सुरू केले. यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास होत आहे.
गेल्या वर्षी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाचुंदकर दाम्पत्याचा हा डाव हाणून पाडून ही ७२ गुंठे सरकारी जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सरकारचे तब्बल १८ कोटी रुपयांचे नुकसान वाचले होते.
जमीन घोटाळ्यात अडकलेले पाचुंदकर दाम्पत्य आता महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदामुळेही वादात सापडले आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीला ट्रस्टचे अध्यक्षपद स्वीकारता येत नसताना, सरपंच आणि एका राजकीय पक्षाच्या सक्रिय सदस्या असलेल्या स्वाती पाचुंदकर यांनी गेल्या वर्षभरापासून हे पद ताब्यात ठेवले आहे.
सध्या देवस्थान ट्रस्टमध्ये काही कोटी रुपयांची अनावश्यक डागडुजीची कामे या दोघांच्या आशीर्वादाने सुरू असून, ट्रस्टमध्येही मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे.
गावठाणाची जमीन लाटल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने पाचुंदकर दाम्पत्याला चांगलाच दणका दिला असून, स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल झाला आहे. स्वाती पाचुंदकर यांच्या अपात्रतेचे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, या न्यायालयीन निर्णयानंतरही पाचुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
रांजणगावच्या सजग नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षपदावरून तातडीने हटवावे, अशी विनंती केली आहे. अन्यथा रांजणगाव देवस्थानच्या ९६ एकर जमिनीवर हे दाम्पत्य डल्ला मारण्यास कमी करणार नाही, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
काय म्हणाले महसूल मंत्री?
दरम्यान, यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्ताच या प्रकरणावर काही बोलता येणार नाही. पण या विषयाची सविस्तर माहिती घेतो आणि बोलतो अशी प्रतिक्रिया दिली.
तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण खूपच गंभीर आहे असे दिसते. कोणत्याही देवस्थानाच्या अध्यक्षांनी आचाराने आणि विचाराने स्वच्छ असावे. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्यांनी तातडीने राजीनामा देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.