
पुणे (Pune) : झाडणकाम करणारे कर्मचारी (Sweeping Workers) शहरातील पुढाऱ्यांचे घरगडी झाले आहेत. अनेक जण मूळ काम सोडून दुसरीकडे काम करत आहेत, तर काही जण कामाला न येता पगार घेत आहेत, अशा प्रकारामुळे रस्त्यावर झाडण्यासाठीचे ४ हजार ३२९ कर्मचारी गायब आहेत. त्यांची गंभीर दखल आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतली आहे. (PMC News)
त्यांनी यासंदर्भातील अहवाल सादर करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना दिले आहेत. झाडणकामातील होणारे गैरव्यवहार, कामगारांची होणारी पिळवणूक समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिकेच्या कायम सेवेतील आणि कंत्राटी असे मिळून एकूण १० हजार २२० कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्या पगारावर महापालिका दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. पण यातील ४० टक्केही कर्मचारी कामावर नाहीत. केवळ ५ हजार ४०६ कर्मचारीच प्रत्यक्षात काम करतात.
त्याच प्रमाणे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्या संगनमताने कामे न करता कर्मचाऱ्यांची हजेरी लावणे, कंत्राटी कामगार घेण्यासाठी त्यांच्याकडून २० हजार ते १ लाखापर्यंत लाच घेणे, सुट्या घेतल्यानंतर गैरहजेरी न लावणे, पगार देऊन त्यातील ५० टक्के हिस्सा स्वतः घेणे, कायम सेवक स्वतः काम न करता दुसरा पगारी नोकर ठेवतात.
शहरातील अनेक राजकारण्यांच्या घरी सफाई काम करणे, पुसणे, भाजी आणणे, गाडी धुवणे, गाडी चालवणे यासारखी कामे करत आहेत. त्यांचा पगार महापालिका देत आहे. हे प्रकार शहरात होत असताना त्यावर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, परिमंडळ उपायुक्तांचे कोणतेही नियंत्रण नाही. चुकीच्या कामांना ते पाठीशी घालत आहेत.
आयुक्तांकडून नाराजी
आयुक्त राम हे शहरात स्वच्छता अभियान घेणार आहेत. त्यासाठी बैठकाही सुरू केल्या आहेत. पण ४ हजार ३०० पेक्षा जास्त कर्मचारी कामावरच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘ही बाब धक्कादायक आहेत. त्यामुळे याचा सविस्तर अहवाल सादर करा,’ असे आदेश अतिरिक्त आयुक्तांना दिले. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा
शहर दिवसेंदिवस घाण का होत चालले आहे. महापालिकेचे कर्मचारी जर अधिकारी व नेत्यांच्या घरी काम करणार असतील, तर शहर कसे स्वच्छ होणार. आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची दखल घेऊन याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. ज्यांच्या घरी महापालिकेचे कामगार काम करतात, ते अधिकारी व नेत्यांवर कारवाई करावी. त्यामळे भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे म्हणाले, महापालिकेचे कर्मचारी इतरत्र काम करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे.