
मुंबई (Mumbai) : मेट्रो 4आणि 4A मार्गिका (Metro 4, Metro 4A) कार्यान्वित झाल्यानंतर सध्याच्या प्रवासाच्या वेळेत तब्बल 50 टक्के पर्यंत घट, दररोज सुमारे12 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भागांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी (Metro Connectivity) मिळेल, वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि प्रदूषणात (Pollution) लक्षणीय घट, पूर्व उपनगर आणि ठाणे (Thane) परिसरात विकासाला चालना मिळेल. या संदर्भातील एक चांगली बातमी सरकारने दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए MMRDA) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण 174.01 हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. एमएमआरडीएने या कामाचे 905 कोटींचे टेंडर एसईडब्ल्यू-व्हीएसई SEW-VSE जॉइंट व्हेंचरला दिले आहे.
सर्व्हे क्रमांक 30 मधील (जुना सर्वे क्रमांक 28) ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या 16 ऑक्टोबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार एमएमआरडीएला “आहे त्या स्थितीत” हस्तांतरित करण्यात आली आहे.
हा डेपो मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून या चारही मार्गिकांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांनी तयार केला होता. एकात्मिकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मोघरपाडा येथे एकच संयुक्त डेपो प्रस्तावित करण्यात आला होता. मोघरपाडा मेट्रो डेपो हे मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचे नियंत्रण व देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
याठिकाणी मेट्रो सेवा बंद असलेल्या वेळेत गाड्या उभ्या करणे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस त्या तत्परतेने वापरता येतील, सर्व मेट्रो गाड्यांची मोठी दुरुस्ती (हेव्ही ओव्हरहॉल) व नियमित देखभाल, उपकरणे काढणे आणि नवीन बसवणे आणि त्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्ण चाचणी करणे, ट्रेन व डेपो प्रणालींचे कामकाज सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) आणि डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) यांच्यामार्फत एकात्मिक नियंत्रण कार्यप्रणाली निर्माण करण्यात येणार आहेत.
तसेच मोघरपाडा डेपोमध्ये मोठ्या देखभालीसाठी 10 वर्कशॉप ट्रॅक, दैनंदिन आणि नियमित तपासणीसाठी 10 निरीक्षण ट्रॅक, रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी 64 स्टेबलिंग ट्रॅक, चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ, गाड्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी ऑटो आणि उच्च क्षमता असलेली वॉश यंत्रणा, अंडरफ्रेम व छतावरील उपकरणांवरील धूळ काढण्यासाठी ब्लो-डाऊन प्लांट, कॅटेनेरी वाहने उभी करण्यासाठी व देखभालीसाठी सीएमव्ही वर्कशॉप, संचालनासाठी डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) आणि प्रशिक्षण कक्ष, आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा निर्माण करण्यात येतील.
एमएमआरडीएच्या २७६व्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानुसार एमएमआरडीएने 905 कोटींचे टेंडर एसईडब्ल्यू-व्हीएसई SEW-VSE जॉइंट व्हेंचरला दिले आहे. 13 जून, 2025 रोजी 'नोटिस टू प्रोसिड' (NTP) जारी करण्यात आली असून, जमीन ठेकेदाराच्या ताब्यात अधिकृतपणे देण्यात आली आहे. त्यामुळे आता डेपोचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.
सिडकोच्या समतोल विकासाच्या मॉडेलशी सुसंगत अशी भरपाई पद्धत एमएमआरडीएने स्विकारली आहे. या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्यात येतात. त्यानुसार पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या 22.5 टक्के भूखंड, अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या 12.5 टक्के भूखंड देण्यात येणार आहेत.
मुख्य रस्ते 18 मीटर रुंद आणि अंतर्गत रस्ते 12 मीटर रुंद ठेवून, सर्व भूखंडांमध्ये सुलभ कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणारा एक मुख्य आराखडा तयार करण्यात आला आहे. हे विकसित भूखंड 36 महिन्यांच्या आत प्रदान करण्यात येणार आहेत.
22 जानेवारी आणि 7 फेब्रुवारी, 2025 रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक सार्वजनिक सल्लामसलत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यात शेतकऱ्यांच्या शंका व अडचणींचे निरसन करण्यात आले. त्यानंतर 198 ऑफर लेटर्स (167 पट्टेधारकांना आणि 31अतिक्रमणधारकांना) वितरित करण्यात आली.