
पुणे (Pune) : पुण्यात शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर तुंबले, चौकाचैकात गुडघाभर पाणी साचले, अनेकांच्या गाड्या बंद पडल्या, वाहतूक कोंडी झाली...असे असूनही कर्मचाऱ्यांनी त्वरित काम सुरू करून १० ते २० मिनिटांत अनेक भागांतील पाण्याचा निचरा करून रस्ते मोकळे केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
शुक्रवारी अनेक रस्त्यांवरून पाणी वेगात वाहात होते. पेठा, डेक्कन जिमखाना; जंगली महाराज, भांडारकर, कर्वे, पौड आदी रस्त्यांसह, स्वारगेट, शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी, कात्रज, हडपसर, नगर रस्ता आदी भागांत पाणी साचले होते. तीन तासांत ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गुंजन चौक, साऊथ मेन रस्ता, आरटीओ चौक, मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन, रेसिडेन्सी चौक, लक्ष्मीनगर धानोरी, वाघोली परिसरातील फुलमळा, आयव्ही इस्टेट या ठिकाणी पाणी साचल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळताच क्षेत्रीय कार्यालयाचे पथक तेथे पोचून पाण्याचा निचरा केला.
शिवनेरी पार्क, भाऊ पाटील रस्ता, सिंध सोसायटी, जंगली महाराज रस्ता, संचेती ग्रेड सेपरेटर, कोथरूड डेपो, बधाई चौक आदी ठिकाणी पाणी साठले होते. वडगाव पूल, जिजामाता भुयारी मार्ग, कात्रज चौक, के. के मार्केट, लेक टाऊन सिटी, स्वारगेट चौक , सेव्हन लव्हज् चौक, मित्रमंडळ चौक, नरपतगिरी चौक, शनिपार चौक, चंदन स्वीट येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणी त्वरित मदत कार्य करून पाण्याचा निचरा दहा ते पंधरा मिनिटात केल्याचा दावा आहे.
महापालिका स्तरावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके तसेच पालिकेकडे असलेल्या यंत्रसामग्रीच्या मदतीने तातडीने कारवाई करून पाण्याचा निचरा करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुद्धा अद्ययावत करण्यात आला आहे. आलेल्या तक्रारींवर संबंधित खात्याशी समन्वय साधत १० ते २० मिनिटांत बहुतांश तक्रारींचे निवारण करण्यात आले.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका