.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : सोलापूर ते मुंबई विमानसेवा (Solapur Mumbai Flight) सुरू करण्यासाठी स्टार ऐअरवेज (Star Airways) कंपनीला ‘एम्ब्रायर-१७५’ श्रेणीतील विमान उडविण्याची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे. सध्या मुंबईतील स्लॉट उपलब्धता व तिकिट बुकिंगच्या तयारीची कामे अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर-पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून ९ जून रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ झाला. गोव्याची विमानसेवा सुरू झाली, मुंबई व पुण्याचीही विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी सोलापुरातील नागरिकांमधून होत आहे.
विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ऑगस्टमध्ये सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर नागरी उड्डाण मंत्रालय युद्ध पातळीवर कामाला लागले आहे.
सोलापूर ते मुंबई दरम्यानच्या विमानसेवेसाठी उडान योजना मंजूर आहे. या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्यासाठी काढलेल्या टेंडर प्रक्रियेत स्टार ऐअरवेजला एटीआर -४२ या श्रेणीतील विमान उडविण्यासाठी डीजीसीएने परवानगी दिली होती. या कंपनीकडे थ्री-सी श्रेणीतील विमान होते. त्यामुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवा लांबणीवर पडली, सोलापूर ते मुंबई या विमानसेवेतून ही कंपनी माघार घेईल, अशीही शक्यता निर्माण झाली होती.
या कंपनीकडे असलेल्या ‘एम्ब्रायर-१७५’ श्रेणीतील विमानासाठी कंपनीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) परवानगी मागितली होती. त्यांना ही परवानगी मिळाली आहे. या श्रेणीतील विमानाची क्षमता ७८ प्रवाशांची आहे.
अन्य ठिकाणांचीही मागणी
सोलापुरसह मराठवाड्यातून तिरुपतीला जाणारे अनेक भाविक आहेत. या भाविकांसाठी सोलापूर ते तिरुपती, बेंगलोर येथील आयटी पार्कशी सोलापुरची कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी बेंगलोर या ठिकाणीही सोलापुरातून विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
सोलापुरातून दिल्लीला जाण्यासाठी रोज धावणारी एक रेल्वे, आठवड्यातून धावणारी एक रेल्वे व गोवामार्गे विमानाने दिल्ली असे पर्याय आहेत. सोलापूर ते दिल्ली अशी थेट विमानसेवा झाल्यास सोलापूरसह शेजारच्या जिल्ह्यांनाही लाभ होणार आहे.