
औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-२ परिसरातील हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील गजबजलेल्या वसाहती आणि मोठ्या बाजारपेठेतून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे काम निकृष्ट व अपघाताला निमंत्रण देणारे ठरणारे असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे काम तातडीने थांबवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक दामोदर शिंदे यांनी दिला आहे.
मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून, मध्यंतरी वाहनांचे अनेक अपघात झालेले आहेत. यात सामान्य नागरिकांना अपंगत्व आले आहे. अनेकांचा बळी गेलेला आहे. आता अर्धवट स्थितीतील रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्याचे काम सुरू झाले असून, या कामामुळे 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत दुभाजकाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, ते काम निकृष्ट असल्याचा आरोप माजी नगरसेवक दामोदर शिंदे यांनी केला आहे.
'टेंडरनामा' पडताळणी
शिंदे यांच्या आरोपानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने प्रत्यक्षात येथील दूभाजकातील कामाच्या टेंडरमधील शेड्यूल - बी मिळवत दुभाजकाची पाहणी केली. हाॅटेल दिपाली ते कामगार चौक, कामगार चौक ते जयभवानीनगर, जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन अशा तीन टप्प्यांत या दुभाजकाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची उंची ३ फूट व रुंदी १२ इंच असून एकून लांबी १६०० मीटर आहे. सदर कामात सिमेंट, खडी आणि क्रश याचे एकत्रित प्रमाण असलेले एम - ३० ग्रेडचे साहित्याचा टेंडरमध्ये उल्लेख केलेला आहे.
कामाचा निकृष्ट दर्जा
सदर काम हे रस्त्याचे व्हाइट टाॅपिंग करणाऱ्या गुरुनानक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.च्या हरविंदरसिंग बिंद्रा यांच्याकडेच दुभाजक निर्मितीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र बिंद्रा यांनी दुभाजक निर्मितीचे कंत्राक परस्पर औरंगाबादच्या जानव्ही कंस्ट्रक्शनच्या दत्ता पोखरकर यांना दिले. परंतु, पोखरकर यांनी टेंडरमधील नमूद असलेल्या साहित्याला फाटा देत बांधकाम केल्याने कामाचा दर्जा ढासळला असल्याचे दिसून आले.
जागृक नागरिकांनी केला भांडाफोड
मंगळवारी (ता. २७) एप्रिल रोजी सकाळी नऊच्या दरम्यान सदर कंत्राटदाराने दुभाजकातील पत्रे काढताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या जागृक नागरिकांना दुभाजकात खडी जास्त आणि रेती, सिमेंट, तसेच क्रशचे प्रमाण कमी असल्याने खडी बाहेर निघालेली दिसली.
माजी नगरसेवकाकडे केली तक्रार
हे काम भविष्यात अडचणीचे ठरणारे आहे. रस्त्यात हा दुभाजक आडवा पडल्यास अपघात होऊ शकतात. त्यामुळे कंत्राटदाराकडून सुरू असलेल्या या निकृष्ट कामाबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दामोदर शिंदे यांना हा प्रकार फोन करून कळवला. त्यांनी लगेच येथील दुभाजकाची पाहणी करत तातडीने काम बंद न केल्यास कंत्राटदार कंपनीच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
कंत्राटदाराचा असा ही जुगाड...
या निकृष्ट कामाचा 'स्पाॅट पंचनामा' करत असतानाच कंत्राटदार पोखरकर याने निकृष्ट कामावर बारदाना टाकत झाकण्याचा प्रयत्न केला. तातडीने सिमेंटची गोणी आणत टोपली सिमेंट आणि पाण्याची कालवाकालव करत पोखरलेल्या सिमेंट दुभाजकात सिमेंट पाण्याची लिपापोती सुरू केली. जर सिमेंट दुभाजकाचा कामाचा दर्जा चांगला असेल, तर त्यावर कोणतेही प्लास्टर न करता थेट रंग काम करण्याची वेळ यायला हवी होती. मात्र येथील दुभाजक कठड्यावर प्लास्टर करण्याची वेळ कंत्राटदारावर का आली, हा खरा प्रश्न असून, प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यामागील कारण शोधायला हवे.
कोण काय म्हणाले...
या संदर्भात 'टेंडरनामा' प्रतिनिधीने जानव्ही कंस्ट्रक्शन कंपनीचा कंत्राटदार दत्ता पोखरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, की या कामाचा मूळ कंत्राटदार गुरुनानक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्याकडून मी हे काम घेतले आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार काम हाती घेण्यात आले असून, काम निकृष्ट असल्यास त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी.
दुसरीकडे महापालिकेचे कार्यकारी अभियंता भागवत फड, उप अभियंता एस. एस. पाटील या जबाबदार अधिकाऱ्यांनी या कामाबाबत कानावर हात ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे कोट्यवधीच्या या कामाच्या देखरेखीची जबाबदारी किरण कुमावत या कंत्राकी कर्मचाऱ्यावर फड यांनी सोपवलेली दिसली. कुमावत यांना दुरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
प्रशासकांचे तपासणीचे आदेश
यानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने थेट महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना झालेला प्रकार कथन करताच त्यांनी या संपूर्ण कामाची तपासणी करण्यासाठी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना आदेश दिले