

नाशिक (Nashik) : नाशिक शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यावर अनोखी शक्काल लढविण्यात आली आहे. (Ramkal Path Tender Contractor News)
सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने शहरात त्या अनुषंगाने पुढील दीड वर्षांत अनेक कामे होणार आहेत. यात कामांच्या दर्जावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने आता या ठेकेदारांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एका ठेकेदाराची म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामकाल पथ या केंद्र सरकारच्या निधीतील प्रकल्पाचे काम सध्या दोन ठेकेदारांकडून सुरू असून आता या कामांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था) नियुक्तीसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरमध्ये सहभागी होण्याची मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत आहे.
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने पंचवटीत काळाराम मंदिर ते रामघाट या परिसरात रामकालपथ उभारण्यासाठी १४६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून नाशिक महापालिकेने आराखडा तयार करून रामकाल पथ प्रकल्पातील कामे करण्यासाठी दोन कंत्राटदार आधीच नियुक्त केले आहेत.
एक कंत्राटदाराला रामकुंड रोड आणि जुन्या पंचवटी परिसरातील रामकाल पथ मार्गावरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन आणि पुनर्स्थापना, दर्शनी भागांची पुनर्स्थापना आणि शहरी घटकांचे पुनर्स्थापना यासाठी २२.६ कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट दिले आहे. यामध्ये मंदिर पुनर्स्थापना, वारसा संरचनांचे पुनर्स्थापना आणि वारसा या थीमनुसार दर्शनी भागांचे उपचार यांचा समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराला जून २०२५ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले.
दुसऱ्या कंत्राटदाराला रामकाल पथच्या विकासासाठी ८३.४ कोटी रुपयांच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये घाट विकास, प्रवेशद्वार, रस्ते विकास, प्रकाश व्यवस्था, वारसा स्थळे, वृक्षारोपण, दगडी शिल्पे आणि भित्तीचित्रे यांचा समावेश आहे.
रामकाल पथमध्ये पाच वटवृक्ष ते रामकुंड काळाराम मंदिरमार्गे अहिल्याबाई होळकर पूल ते गाडगे महाराज पूल आणि पुढील टप्प्यांमध्ये टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतचा विस्तार या कामांचा समावेख आहे. ही कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण करायचा आहेत.
कामाच्या घाईमध्ये दर्जावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने या ठेकेदारांना केलेल्या कामांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे एका ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एक नवीन ठेकेदार नियुक्ती करण्यात येणार आहे.
यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. या सल्लागार संस्थेवर कामाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदार असणार आहे. ज्यामध्ये बांधकाम देखरेख आणि एकूण प्रकल्प व्यवस्थापनाचा यांचा समावेश आहे. सल्लागार संस्थेवर कामाचे नियोजन, समन्वय, अंमलबजावणीवर देखरेख, सुरक्षिततेचे निरीक्षण, विविध संस्थांशी समन्वय आणि बांधकामासाठी वापरलेल्या साहित्याचे गुणवत्ता नियंत्रण अहवालांचे पुनरावलोकन याची जबाबदारी असणार आहे.
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था ही या कामाबाबत नाशिक महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. हा प्रकल्प वेळेत आणि गुणवत्ता मानकांनुसार पूर्ण करण्याची जबाबदारी या प्रकल्प व्यवस्थापन संस्थेवर असणार आहे