

मुंबई (Mumbai): नवी मुंबईतील रियल इस्टेट क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे.
सिडकोने खारघर येथील सेंट्रल पार्कजवळचा एक भूखंड तब्बल 5 लाख 6 हजार रुपये प्रति चौरस मीटर या विक्रमी दराने विकला आहे. या एकाच व्यवहारामुळे सिडकोच्या तिजोरीत दोन हजार 200 कोटी रुपये जमा झाले असून, नवी मुंबईतील घरांच्या किमती आता गगनाला भिडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर शहराच्या रियल इस्टेट मार्केटने जोरदार 'टेकऑफ' सुरू केले आहे. खारघर सारख्या प्राइम लोकेशनमध्ये एका चौरस फुटाचा भाव 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
खारघर येथील सेक्टर 23 मध्ये असलेल्या 41 हजार 994 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडाला मिळालेला विक्रमी दर हेच सिद्ध करतो. सेंट्रल पार्क आणि नियोजित आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्कच्या अगदी जवळ हा भूखंड असल्याने संपूर्ण रियल इस्टेट वर्तुळाचे लक्ष या व्यवहाराकडे लागले होते.
भूखंडाचे महत्त्व लक्षात घेऊन सिडकोने टेंडरमध्ये मूळ दर 3 लाख 51 हजार रुपये प्रति चौरस मीटर इतका नमूद केला होता. प्रशासनाला जास्तीत जास्त चार लाख रुपये प्रति चौरस मीटर दर मिळण्याची अपेक्षा होती, मात्र ई-ऑक्शनमध्ये ही अपेक्षा कितीतरी पटीने वाढली.
या महत्त्वाकांक्षी भूखंडासाठी एकूण आठ कंपन्यांनी टेंडर भरले होते. तीव्र स्पर्धेमध्ये, आकार अॅस्ट्रोम या कंपनीने चौरस मीटरला 5 लाख 6 हजार रुपयांचा दर कोट करून बाजी मारली. हा दर सर्वाधिक असल्याने भूखंड या कंपनीला मिळाला. स्पर्धेत नोबल ऑरगॅनिक्सने 5 लाख 5 हजार, तर लोढा डेव्हलपर्सने 5 लाख रुपयांची बोली लावली होती.
खारघरमधील या भूखंडावर निवासी आणि वाणिज्य वापरासाठी विकास करण्याची अट सिडकोने ठेवली आहे. यासाठी दीड एफएसआय (FSI) मंजूर करण्यात आला आहे. एका चौरस फुटाचा दर थेट 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे, या भूखंडावर तयार होणाऱ्या अपार्टमेंट्स आणि कमर्शियल जागांच्या किमतीतही मोठे 'टेकऑफ' पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खारघरमधील भूखंडाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्यात खारघरच्या सेक्टर 6 मधील 3 हजार चौरस मीटरच्या भूखंडाला 7 लाख 35 हजार रुपये प्रति चौरस मीटरचा विक्रमी दर मिळाला होता. त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत सेंट्रल पार्कजवळच्या या भूखंडाला मिळालेला 5 लाख 6 हजार रुपयांचा दर, नवी मुंबईच्या रियल इस्टेटमधील वाढत्या मागणीचे चित्र दर्शवितो.