

नाशिक (Nashik) : येथील ओझर विमानतळावरून प्रवासी वाहतुकीचे नवनवीन विक्रम स्थापित होत असतानाच आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीत (कार्गो) नाशिक (ओझर) विमानतळावरून लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर या काळात या विमानतळावरून ४०४८ मेट्रिक टन निर्यात केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या या काळापेक्षा ही वाढ अडीच पट अधिक आहे. नाशिक येथील विमानतळावरून प्रामुख्याने द्राक्षे, कृषी उत्पादने, कुक्कुटपालन, संरक्षण आणि औद्योगिक वस्तूंची निर्यात होत असते.
नाशिक जिल्हा प्रामुख्याने भाजीपाला, फळे व कुक्कुटपालन उत्पादनात आघाडीवर आहे. त्यात द्राक्ष निर्यातीतही नाशिक देशात आघाडीवर आहे. याशिवाय संरक्षण व इतर औद्योगिक उत्पादनाचीही नाशिकमधून निर्यात होत असते. या कार्गो निर्यात हाताळण्यासाठी एचएएल व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी मिळून हालकॉन ही कंपनी स्थापन केली आहे.
या कंपनीच्या माध्यमातून विमानाद्वारे मालवाहतूक निर्यातीचे व्यवस्थापन केले जाते. ओझर विमानतळावरून २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४१०१ मेट्रिक टन निर्यात २५० विमान उड्डाणांद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हालकॉनने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७००० मेट्रिक टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी पहिल्या सहामाहीतच या विमानतळावरून मागील वर्षाएवढी निर्यात केली आहे.
एप्रिल २०२५ तेसप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत ही हवाई मालवाहतूक ४०५८ मेट्रिक टनापर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हाताळल्या गेलेल्या १५१९ टनांच्या तुलनेत ही अडीच पटींपेक्षाही अधिक वाढ आहे.
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामहिन्यांमध्ये हालकॉनने द्राक्षे, कृषी उत्पादने, कुक्कुटपालन, संरक्षण आणि औद्योगिक वस्तूंची २२९ मालवाहू उड्डाणांद्वारे निर्यात हाताळली आहे. मागील वर्षी याच कालावधीतील ९१ मालवाहू उड्डाणांच्या तुलनेत ही वाढ अडीचपटीपेक्षा अधिक आहे. हालकॉनने मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) ४१०१ मेट्रिक टन निर्यात २५० विमान उड्डाणांद्वारे हाताळली गेली. हालकॉनने गेल्या आर्थिक वर्षात हाताळलेली आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक यंदा पहिल्या सहामाहीतच गाठली आहे. म्हणजे हालकॉनने यंदाचे ७ हजार मेट्रिक टन उद्दिष्टाच्या ५७ टक्के निर्यात पहिल्या सहामाहीत हाताळली आहे.
ओझर येथील विमानतळावरील हवाई मालवाहतूक हाताळणी आणि इतर शुल्क हे मुंबई विमानतळाच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे निर्यातदार नाशिक विमानतळावरून मालवाहतूक निर्यातीला प्राधान्य देत असल्याने या मालवाहतूक निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकमधून कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, कुक्कुटपालन, अभियांत्रिकी आणि इतर विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी प्रचंड क्षमता आहे.
नाशिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात द्राक्षे, कांदे आणि इतर बागायती उत्पादनांमुळे कृषी केंद्र म्हणून ओळखले जाते. यामुळे येत्या काही वर्षांत नाशिक विमानतळावरून हवाई मालवाहतुकीत आणखी वाढ होण्याचा अंदाज या क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.