

मुंबई (Mumbai): महाराष्ट्रातील तीन प्रमुख ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ आणि श्री क्षेत्र घृष्णेश्वर यांच्या सर्वसमावेशक विकास आराखड्यास गती मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या तिन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 'उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा' तयार करण्याचे तसेच 'आधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली' कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिर परिसरात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची सूचना केली आहे. या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून एक एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित केली जाईल.
यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी मदत करणे शक्य होणार आहे. यासोबतच, मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
ज्योतिर्लिंगांना वर्षभर भेट देणाऱ्या भाविकांची सध्याची आणि भविष्यातील वाढती संख्या विचारात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी सुविधांची एक व्यापक यादी निश्चित केली आहे.
या अंतर्गत दर्शन रांगांचे योग्य नियोजन करणे, यात्रा उत्सव कालावधीनुसार प्रतिक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची उत्तम व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, सुसज्ज पार्किंग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा आणि उपहारगृह (रेस्टॉरंट) यासारख्या आवश्यक सोयी-सुविधा त्वरित तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
या विकासकामांमध्ये स्थानिक नागरिक व प्रशासनाला विश्वासात घेऊन कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. विशेषतः पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणारे उपक्रम या भागात राबवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाला दिले आहेत.
या महत्त्वाच्या बैठकीत सामान्य प्रशासन, वित्त, महसूल, नगर विकास अशा विविध विभागांच्या अपर मुख्य सचिवांनी भीमाशंकर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर येथील विकास आराखड्यांचे सादरीकरण केले. सादर झालेल्या या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून तातडीने मंजुरी मिळाल्यावर निधी उपलब्ध होईल. पुरातत्त्व विभागाकडून आवश्यक मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांसोवेत एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
त्यामुळे, महाराष्ट्रातील ही तीन ज्योतिर्लिंगे लवकरच अध्यात्माचे केंद्रासोबतच अत्याधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि स्थानिक विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून उदयास येतील, अशी अपेक्षा आहे.