.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai) : मुंबईत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच रस्त्यांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या दर्जा व्यवस्थापन संस्थेवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिकेने सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शहर व उपनगरातील रस्त्यांची बहुतांश कामे सुरू झाली असली तरी अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा जाऊन, निकृष्ट कामांच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. शहरातील सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा चांगला राहावा, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आयआयटी यांची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची अंमलबजावणी सुरू करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. यामध्ये काँक्रीट प्लांटपासून ते रस्त्यावर क्यूरिंग करण्यापर्यंतच्या कामाचा समावेश असून, विविध चाचण्यांच्या माध्यमातून दर्जा तपासला जाणार आहे. अधिकारी व कंत्राटदार यांना गुणवत्तेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आयआयटीकडे आहे. उर्वरित कामांची जबाबदारीही येत्या काळात आयआयटीला देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर अशा एकूण ७०१ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणतः ३०-४५ दिवसांचा कालावधी जातो. दर्जाशी कोणतीही तडजोड न करता हे रस्ते किमान ३० वर्षे टिकावेत, अशारीतीने काम व्हावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. रस्त्यांच्या कामांबाबत तक्रारी आल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा : ऍड आशिष शेलार
मुंबईत निकृष्ठ दर्जाची रस्त्याची कामे करण्यात येत असून या कामांचे कॉलिटी ऑडिट करा तसेच निकृष्ठ दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करा, अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोड या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याचे केलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले होते. नव्याने बांधलेल्या रस्त्याला तडा गेल्या आहेत, सिमेंट निघून खडी बाहेर पडून रस्ता पुन्हा खराब झाल्याचे निदर्शनास आले होते. अशाच प्रकारे मुंबईत अन्य ठिकाणी जी कामे सुरू आहेत ती योग्य दर्जाची होत आहेत का, कामांचे कॉलिटी ऑडिट करण्यात येते का याकडे लक्ष वेधत आमदार ऍड आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. तसेच सांताक्रुझ येथील कामांची चौकशी करा अशी मागणी केली.