
मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए (MMRDA) बाळासाहेब ठाकरे यांचे 11800 चौरस मीटर क्षेत्रफळावर राष्ट्रीय स्मारक साकारत आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यांमध्ये पार पाडले जात असून पहिल्या टप्प्यात २५० कोटी दुसऱ्या टप्प्यात १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील कामांवर शेवटचा हात फिरवला जात असून दुसऱ्या टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट, व्हर्चूअल रिअलिटी, हार्डवेअर आणि साहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञानविषयक कामे पार पाडली जाणार आहेत.
दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. नवीन वर्षात स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा होणार आहे. एमएमआरडीएकडून बाळासाहेब ठाकरे यांचे 11800 चौरस मीटर क्षेत्रफळावर राष्ट्रीय स्मारक साकारण्यात येत आहेत. स्मारकाचे काम दोन टप्प्यांमध्ये पार पाडले जात असून पहिल्या टप्प्यात २५० कोटी दुसऱ्या टप्प्यात १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 250 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. स्मारकाच्या या कामाला 2021 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सध्या पहिल्या टप्प्यातील स्मारकाचे काम 99 टक्के काम पूर्ण झाले असून 25 डिसेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या परिसरात 115 वर्षे जुना महापौर बंगला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाच्या 602 चौ. मी. क्षेत्रफळावरील इमारतीचे जतन, संवर्धन करण्यात आले आहे. तसेच प्रशासकीय इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील कामांमध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट, व्हर्चूअल रिअलिटी, हार्डवेअर आणि साहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञानविषयक कामे पार पाडली जाणार आहेत. तसेच दृकश्राव्य माध्यमातून कथा देखील सांगितली जाणार आहे. तसेच एमएमआरडीएने या संपूर्ण कामांसाठी सल्लागार म्हणून आभा लांबा असोसिएटची नियुक्ती केली आहे.