
मुंबई (Mumbai) : मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो-३ (Metro 3) च्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे ते कफ परेड पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यामध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांचा समावेश आहे. हे काम म्हणजे पूर्ण मार्गिका कार्यान्वित होण्याच्या दिशेने प्रकल्पाच्या प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन, एमएमआरसीने (MMRC) दिली आहे.
मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत दुसरा टप्पा मे २०२५ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारेल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरे कॉलनी ते बीकेसी ला जोडणारा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी कार्यान्वित केला. पहिल्या दिवशी सकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत २०,४८२ प्रवाशांनी मेट्रो सुविधांचा लाभ घेतला. व्यावसायिक कामकाजाच्या पहिल्या रविवारी २७,१०८ प्रवाशांनी प्रवास केला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. पहिल्या महिन्यात ६,००,०००पेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रो ३ मार्गिकेवर प्रवास केला आहे. या मार्गावरून दररोज सरासरी २०,०००हून अधिक लोक प्रवास करत आहेत.
प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन आरे-जेव्हीएलआर स्थानकावर नवीन पादचारी क्रॉसिंग सुरू करण्यात आले आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर ब्लिंकर सिग्नल, कॅट आय आणि रंबलर स्ट्रिप्स देखील बसवण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो एक्वा लाईन ३च्या प्रगतीमुळे मुंबईकरांच्या जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाच्या शक्यतांना बळ मिळाले आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
मेट्रो -३ ची जबरदस्त कामगिरी-
एकूण प्रवाशी संख्या: 11,97,522
नियोजित फेऱ्यांची संख्या: 13,504
वास्तविक फेऱ्या: 13,480
सरासरी वक्तशीरपणा: 99.61%
विलंब : ०.३७% (५१)
ट्रिप रद्द: 0.17% (24)