
नागपूर (Nagpur) : ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशात प्रचंड ऊन आणि उकाडा वाढू लागला आहे. कोविडनंतर चिनी बनावटीच्या कुलरऐवजी आखाती देश भारतीय प्रॉडक्ट्सला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळेच प्रचंड उष्ण अशा इराण, इराकसह आखाती देशांमध्ये 'डक्ट डेझर्ट एअर कुलर'च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. यानिमित्ताने नागपुरातील ‘डक्ट डेझर्ट कुलर'चा गारवा आखाती देशांना हवा हवासा झाला आहे.
कडकडीत उन्हाळा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात जगातील आघाडीच्या उष्ण शहरांमध्ये विदर्भातील तीन शहरांचा समावेश होता. नागपूरचे तापमानही ४४ अंश सेल्सिअसच्या जवळपास गेलेले आहे. विदर्भासह नागपूरकरांना डेझर्ट कुलरमुळे गारवा मिळत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात विदर्भात कुलरच्या मागणीत प्रचंड वाढते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसायातच नव्हे तर सर्वांच्याच जीवनशैलमध्ये खूप बदल झाला आहे. तसाच बदल आता कुलरच्या मागणीतही झालेला आहे. कोरोनापूर्वी आखाती देशात मोठ्या प्रमाणात चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या कुलरला मागणी होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर चिनी उत्पादनावरील विश्वास कमी झालेाला आहे. परिणामी, भारतीय बनावटीच्या कुलर्सची इराण-इराकसह संपूर्ण आखाती देशांतून मागणी वाढली आहे.
चीनमध्ये तयार केलेले कुलर हे प्लॅस्टिकपासून तयार केले जात होते. भारतीय बनावटीचे कुलर हे लोखंडापासून तयार केले जातात. तसेच गुणवत्ताही चांगली असून विश्वासार्हता प्राप्त केल्याने आखाती देशामध्ये मागणीत सतत वाढ होत आहे. मागील वर्षी नागपुरातून सॅम्पल म्हणून चार कंटेनर कुलर पाठविले होते. तेथील नागरिकांना कुलर आवडला असून अल्हाददायक गारवाही उत्तम प्रकारे देऊ लागला आहे. तेथील तापमान ४९ ते ५० अंश सेल्सिअस असते. त्या उष्ण हवामानात एसीही काम करीत नसल्याने कुलरच त्यांना थंडावा देत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. परिणामी, सतत मागणी वाढत आहे. नुकतेच दहा कंटेनरमध्ये कुलर पाठविले आहे. अजून १०० कंटेनरची मागणी येण्याची शक्यता आहे.
आखाती देशांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उन्हाळा अधिक असतो. पुढील महिन्यापासून तेथील सीझन सुरू होत असल्याने भारतीय बनावटीच्या कुलरची मागणी वाढू लागली आहे. पहिल्या टप्प्यात दहा कंटेनर पाठविले आहेत (एका कंटेनवरमध्ये २०० कुलर). लवकरच हा आकडा शंभर कंटेनरवर जाईल. भारतीय उत्पादकांची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेमुळे ही मागणी वाढलेली आहे. अतिशय सुलभ पद्धतीने असेम्बल करता यावा या दृष्टीने हे कुलर तयार केलेले आहेत.
- राकेश अवचट, संचालक, राम कूलर्स