
मुंबई (Mumbai) : मुंबईत 'सी-1' कॅटेगरीत म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीत तब्बल 337 इमारती असल्याची आकडेवारी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नुकतेच जाहीर केले आहे. यामध्ये शहर विभागात 70, पूर्व उपनगरात 104, तर पश्चिम उपनगरात 163 अतिधोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळण्याचा धोका असल्याने रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याआधी मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. यावर्षीदेखील महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. या सर्वेक्षणात 25 एप्रिल रोजीची अद्ययावत यादी वेबसाईट www.mcgm.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईतील 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी ऑडिटर अभियंत्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिवाय धोकादायक इमारतींबाबत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या 1916/22694725/ 22694727 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.
असा ओळखा इमारतीचा धोका...
- इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.
- इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.
- इमारतीचा तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.
- इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.
- इमारतीच्या कॉलममधील काँक्रीट पडत असल्याचे दिसणे.
- इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासाखा दिसणे.
- इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा/भेगा दिसणे.
- स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे काँक्रीट पडत असल्याचे दिसणे.
- इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.