नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग

सुखजीत स्टार्चकडून चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात १२५ एकरांवर प्रकल्प; पहिल्या टप्प्यात दररोज १,२०० टन मक्यावर प्रक्रिया, १,००० हून अधिक थेट रोजगार
नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग
Chhagan BhujbalTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी चिचोंडी औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२५ एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच वीज आणि पाणीपुरवठ्याबाबत मंत्रालयात बैठक झाली.

नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग
अंबड-सातपूर एमआयडीसीतील सांडपाण्यावर अखेर उपाय; 2 एसटीपींचा प्रस्ताव

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च लिमिटेड यांनी सामंजस्य करार (MoU) करून पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

नाशिकच्या मक्याला स्थानिक प्रक्रिया उद्योग

नाशिक जिल्ह्यात खरीप मक्याचे सरासरी क्षेत्र तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. राज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, जिल्ह्यात मक्यावर प्रक्रिया करणारा मोठा उद्योग नसल्याने उत्पादकांना इतर ठिकाणच्या उद्योगांवर अवलंबून राहावे लागते.

ही गरज लक्षात घेऊन चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. यासाठी उद्योग विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग
सिन्नरमध्ये चिंचोलीत नवे इंडस्ट्रियल टाऊन; NMRDAचे 41 कोटींचे टेंडर

दोन टप्प्यांत मक्यावर प्रक्रिया

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज १,२०० टन, तर दुसऱ्या टप्प्यात दररोज २,४०० टन मक्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्यावर प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकल्पाचा येवला आणि परिसरातील सुमारे ५० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच १,००० हून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. वाहतूक, साठवणूक, कृषी सेवा, देखभाल आणि लॉजिस्टिक्ससह पूरक व्यवसायांमधून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

६ मेगावॅट वीज, ५० लाख लिटर पाणी

प्रकल्पासाठी स्वतंत्र फिडरद्वारे ६ मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच नांदूर मधमेश्वर धरणातून दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

जमीन, पाणी, वीज आणि अन्य पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योग विभाग, जलसंपदा विभाग, एमआयडीसी, महावितरण आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग
Gargai-Dev River Link: सिन्नरच्या दुष्काळावर 13,500 कोटींच्या नदीजोड प्रकल्पाचा उतारा

येवल्याच्या औद्योगिक विकासाला चालना

मका प्रक्रिया उद्योगामुळे केवळ शेतमालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार नाही, तर येवला तालुक्यातील औद्योगिक विकास आणि स्थानिक तरुणांच्या रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

बैठकीला आमदार पंकज भुजबळ, MITRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे माजी खासदार समीर भुजबळ, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र कुशवाह, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आदी सहभागी झाले.

नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग
सिन्नरच्या बाह्यरिंगरोड भूसंपादनाचा प्रश्न सुटला; महाजनको उचलणार 50 टक्के भार

Key Points

  • येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ७६० कोटींचा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती,

  • सुखजीत स्टार्चकडून सुमारे १२५ एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्याचे नियोजन,

  • पहिल्या टप्प्यात दररोज १,२०० टन आणि दुसऱ्या टप्प्यात २,४०० टन मक्यावर प्रक्रिया,

  • सुमारे ५० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा,

  • प्रकल्पातून १,००० हून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार,

  • स्वतंत्र फिडरद्वारे ६ मेगावॅट वीज आणि दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन,

  • प्रकल्पासाठी उद्योग विभाग आणि कंपनीमध्ये MoU करून पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना.

Tendernama
www.tendernama.com