सिन्नरच्या बाह्यरिंगरोड भूसंपादनाचा प्रश्न सुटला; महाजनको उचलणार 50 टक्के भार

Sinar MIDC
Sinar MIDCTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिन्नर शहराजवळील माळेगाव व मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी सात किलोमीटरचा रिंगरोड अर्थात बाह्यवळण रस्ता उभारण्यात येणार आहे. एमआयडीसीने या रस्त्यासाठी आवश्यक ३१ हेक्टरच्या भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध केली होती. मात्र, त्या भूसंपादनाचा खर्च कोणी करायचा, यावरून हे भूसंपादन प्रलंबित असल्याने हा रस्ता रखडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकित भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून आता या मार्गाच्या भूसंपादनाच्या खर्चाचा भार खर्च महाजनको व एमआयडीसी प्रत्येकी ५० टक्के उचलणार आहे. या बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह एमआयडीसी व महाजनकोचे अधिकारी उपस्थित होते.

Sinar MIDC
Sinnar Road Project: सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी फुटणार! 'या' 2 प्रमुख रस्त्यांचा होणार कायापालट

सिन्नर शहराच्या पश्चिम व पूर्व बाजूस माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहती आहेत. तसेच मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीला लागून इंडिया बुल्स विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आहे. या औद्योगिक वसाहतींमुळे सिन्नरच्या विकासाला गती मिळाली आहे. नवीन उद्योगांमुळे रोजगार वाढला तसा शहराचा विस्तारही होत आहे.

सिन्नर शहरातून जात असलेल्या नाशिक पुणे महामार्ग व घोटी सिन्नर मार्ग यामुळे वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीवर बाह्य वळण मार्गाद्वारे उपाय शोधला आहे. तसेच घोटी सिन्नर मार्गही सिन्नर बाहेरून गुरेवाडीमार्गे वळवण्यात आला आहे. यामुळे सिन्नरमधील वाहतूक कोंडी सुटली आहे. दरम्यान सिन्नरच्या या दोन्ही औद्योगिक वसाहतीना जोडणारा स्वतंत्र मार्ग नसल्याने ही वाहतूक सिन्नर शहरातून होत असते. तसेच सिन्नरच्या उत्तर भागातल्या नव वसाहतींमधील रहिवाशांना या औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारासाठी जाताना सिन्नर शहरातून जावे लागत असते. त्यामुळे महार्गावरील वाहतूक कोंडी सुटली असली तरी सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे.

Sinar MIDC
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षण? सिन्रर तालुक्यात मोजणी

यावर उपाय शोधण्यासाठी सिन्नरच्या उत्तर बाजूने माळेगाव ते मुसळगाव असा सात किलोमीटर लांबीचा बाह्यवळण रस्ता एमआयडीसीने प्रस्तावित केला आहे. हा बाह्यवळण रस्ता माळेगावजवळ नाशिक-पुणे महामार्गापासून सुरू होऊन सिन्नर शिर्डी मार्गाला मुसळगाब येथे जोडला जाणार आहे. या सात किलोमीटर बाह्यवळण मार्गामुळे नाशिकहुन शिर्डीला जाणाऱ्या वाहनांना सिन्नरच्या दक्षिण बाजूच्या सध्याच्या बाह्यवळण रस्त्याने जाण्याची गरज पडणार नाही. तसेच गुरेवाडीमार्गे लांबचा वळसा टाळता येणार आहे. त्याचबरोबर  सिन्नरच्या उत्तर भागातील लोकांना औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी अथवा नाशिक, शिर्डी रस्त्यावर येण्यासाठी सिन्नर शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही.

त्यादृष्टीने या बाह्यवळण रस्त्याची सिन्नरकरांना नितांत आवश्यकता आहे. यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांनी एमआयडीसीकडे प्रस्ताव मांडल्यानंतर सात किलोमीटर रस्त्यासाठी प्रथमत: भूसंपादनाची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार ३१ हेक्टर रस्त्यासाठी जमिनीची आवश्यकता लागेल. साधारणत: ४५ मीटर रुंद व सात किलोमीटर लांबीचे भूसंपादन केले जाणार आहे. मात्र, भूसंपादनाच्या खर्चावरून मार्ग पुढे सरकत नव्हता.

Sinar MIDC
Nashik Shirdi Railway: नाशिक-पुणे ऐवजी नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गाला गती; 'त्या' 34 गावांत भूसंपादनाचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या खर्चास नकार दिल्यानंतर दोन औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार असल्याने व या मार्गाचा सर्वाधिक फायदा आता महाजनकोला होणार असल्याने अखेर भूसंपादनाचा खर्च महाजनको व एमआयडीसी यांनी प्रत्येकी ५० टक्के करण्याबाबत सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत निर्णय झाला आहे.

दरम्यान एमआयडीसीच्या पुढील बैठकीत या मार्गाच्या भूसंपादनाचा विषय ठेवण्यात येणार आहे. नव्याने स्थापित होणारे मापारवाडी औद्योगिक क्षेत्रही या मार्गाजवळ आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांनाही या मार्गाचा लाभ होणार आहे. दोन्ही वसाहती या मार्गाने जोडल्या जाणार असून गुळवंच येथे नव्याने होत असलेले औद्योगिक वसाहत, महाजनकोचा प्रकल्प याची वाहतूकही याच मार्गे होणार आहे. याशिवाय इंडियाबुल्स सेझच्या प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या विकसित भूखंडांकडे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा ठरणार आहे.

Tendernama
www.tendernama.com