Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षण? सिन्रर तालुक्यात मोजणी

सिन्नरमधील मुसळगाव, दातली आणि दोडी बुद्रुक शिवारात प्रत्यक्ष जागेवर खांब रोवल्याने शेतकरी संभ्रमात; शिर्डी मार्गाला झालेल्या विरोधानंतर पाचव्यांदा सर्वेक्षणाची चर्चा
Nashik Pune Railway
Nashik Pune RailwayTendernama
Published on

नाशिक (Nashik): रखडलेल्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग पुन्हा बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सिन्नर तालुक्यातील मुसळगाव, खंबाळे आणि दोडी बुद्रुक शिवारात अचानक ५० ते ६० मीटर रुंदीची गुप्त मोजणी सुरू झाली असून, प्रत्यक्ष शेतात खांब रोवले गेल्याने हे रेल्वेचे पाचवे सर्वेक्षण आहे का, यावरून शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये तीव्र संभ्रम पसरला आहे.

Nashik Pune Railway
Nashik: गंगापूर रोडला समांतर मार्गासाठी आता 66 कोटींचा नवा प्रस्ताव; प्राधिकरण काय निर्णय घेणार?

नाशिक पुणे रेल्वेमार्गाच्या प्रश्नाचे भीजत घोंगडे पडले असताना आता सिन्नर तालुक्यात पुन्हा एका मार्गाची मोजणी झाली आहे. ही मोजणी नाशिक पुणे महामार्ग व सिन्नर-शिर्डी या दोन मार्गांच्या दरम्यान झाली आहे. ही मोजणी रस्त्याची आहे की रेल्वेमार्गाची याबाबत जमीनधारकांमध्ये संभ्रम आहे.

दरम्यान सिन्नर तालुक्यात या आधीच नाशिक-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्ग असून नाशिक-चेन्नई महामार्गाचे काम प्रस्तावित आहे. यामुळे सिन्नत तालुक्यात नवीन महामार्गाला जागा नसल्याने ही मोजणी नाशिक-पुणे मार्गाचीच असल्याची चर्चा आहे. यामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे आरेखन पुन्हा बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे आरेखन चारवेळा बदलले असून आता चौथ्यांदा सर्वेक्षण सुरू असल्याची चर्चा आहे.

Nashik Pune Railway
Nashik Ring Road: नाशिकचा 7,600 कोटींचा रिंगरोड सिंहस्थापूर्वी पूर्ण होणे अशक्य? काय आहेत कारणे?

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय झाला आहे. महाराष्ट्र सरकारने हा रेल्वेमार्ग महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तो मार्ग संगमनेर- अकोला या दोन तालुक्यांमधील गावांमधून जाणार होता, त्याच्या आरेखनात बदल करून तो संगमनेर शहराच्या जवळून नेण्यात आला. यामुळे त्याच्या आरेखनात बदल झाला. त्यानंतर या नवीन आरेखनानुसार नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियाही पार पडली.

दरम्यान राज्यात पुन्हा २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर या नवीन आरेखनाचा मार्ग व्यवहार्य नसल्याचे कारण देत तसेच नारायणगाव येथील जीएमआरटीच्या महाकाय दुर्बीनींना धोका असल्याचे कारण देत रेल्वेमंत्रालयाने या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यास नकार दिला. त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गात बदल करीत व्यवहार्य करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी हा रेल्वेमार्ग नाशिक-शिर्डी- पुणतांबे-नगर- चाकण असा प्रस्तावित केला. त्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला.

Nashik Pune Railway
द्वारका ते दत्तमंदिर 10 पदरी रस्ता 12 महिन्यांत अशक्य? 177 कोटींच्या टेंडरप्रकरणी कंत्राटदारांचे काय आहेत आक्षेप?

हा नवीन रेल्वेमार्ग सिन्नर तालुक्यातून सिन्नर-शिर्ड़ी या राज्यमार्गाने समांतर प्रस्तावित करण्यात आला होता.  मात्र, या नवीन रेल्वेमार्गाचा नाशिक, नगर प पुणे जिल्ह्यातील नागरिकांना काहीही फायदा होणार नाही, ही बाब निदर्शनास आणून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर येथील लोकप्रतिनिधींनी या मार्गास विरोध केला, आंदोलने केली.

रेल्वेमंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांना भेटून रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे नेण्यास विरोध दर्शवला. विधीमंडळ, संसदेत मुद्दा उपस्थित केला. यामुळे नाशिक-शिर्डी- नगर- चाकण या रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार होऊनही त्याला मंजुरी देण्यात आली नाही. एवढेच नाही, तर मधल्या काळात शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग रद्द झाल्याचीही चर्चा समोर आली.

यामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग रद्द झाल्याचे मानले जात असताना सिन्नर तालुक्यात या मार्गासाठी मोजणी होऊन प्रत्यक्ष जागेवर खांब रोवण्यात आले आहेत. आता या रेल्वेमार्गासाठी सिन्नर तालुक्यात मुसळगाव, दातली, खंबाळे, दोडी बुद्रूक, मानोरी, कनकोरी आदी गावांमध्ये मोजणी करण्यात आली आहे. यामुळे हा मार्ग थोडा दक्षिणेकडून प्रस्तावित केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nashik Pune Railway
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग आता चेष्टेचा विषय झालाय का?

माझ्या खंबाळे शिवारातील जमिनीत मोजणी झाली आहे. साधारण ५० ते ६० मीटर रुंदीची मोजणी केली असून दोन्ही बाजूला दगड रोवून ठेवले आहेत. मोजणासाठी आलेल्या लोकांना आम्ही हे कशासाठी केले जात आहे, याबाबत विचारले. मात्र, त्यांनी आम्हाला काहीही माहित नसल्याचे सांगितले.
- विठोबा शिंदे, शेतकरी, दोडी बुद्रूक

Tendernama
www.tendernama.com