

नाशिक (Nashik): गोदावरीच्या उजव्या बाजूने गंगापूररोडला समांतर रस्ता मंजूर करण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणने नाकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यावर फुली मारली होती. त्यानंतर आता नाशिक महापालिकेने भोसला संस्था ते बारदान फाटा या दरम्यान गंगापूररोडला समांतर रस्ता तयार करण्याचा ६६ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेने हा प्रस्ताव मंजुरीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणकडे पाठवला असून त्यांच्या मान्यतेनंतर या रस्त्याचे भविष्य ठरणार आहे.
गंगापूररोड हा नाशिक शहरातील उच्चभ्रूवस्तीतून रस्ता असून तो सध्या अपुरा पडत असल्याने त्याच्यावरील भार कमी होण्यासाठी त्याला समांतर गोदावरीच्या उजव्या बाजूने रस्ता व्हावा, अशी मागणी जवळपास वर्षभरापासून होत आहे.
माजीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी पहिल्यांदा नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांचा भेट सिंहस्थ आराखड्यात या समांतर रस्त्याचा समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापौर झाल्यानंतर हिमगौरी आडके यांनीही काही दिवसांपूर्वी गंगापूररोडला समांतर रस्ता होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्या मागणीलाही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर परिषदेत आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडला समांतर रस्ता करणे किती आवश्यक आहे, हे आकडेवारी मांडून सांगितले होते.
गोदावरीच्या पलिकडेही विकास होत असून भविष्यात या रस्त्याची आवश्यकता असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा आयुक्तांना याबाबत विचारले असता कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थात किती व कोणती कामे करायची, याच्या सीमारेषा निश्चित करण्याची गरज आहे, अशा आशयाचे उत्तर दिले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी लग्नात बारसे उरकण्याचे प्रकार करू नका, असे स्पष्ट केल्याने त्या रस्त्याचा विषय मागे पडला.
त्यानंतर आता नाशिक महापालिकेने गंगापूररोडला समांतर रस्ता म्हणून भोसला महाविद्यालय ते कबीर नगर झोपडपट्टीमार्गे बारदान फाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचा ६६ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण समितीकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला आहे.
सिंहस्थासाठी रस्त्यांची कामे मंजूर करताना गंगापूर रोडचा स्वतंत्र विचार झाला नव्हता. बारदान फाटा ते अशोक स्तंभ या गंगापूर रोडवर भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पर्यायी मार्ग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार, सध्या ९ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याचे एकूण १५ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. म्हणजेच अतिरिक्त ६ मीटरचा रस्ता विकसित होणार आहे. कबीर नगर झोपडपट्टीमुळे येणारा अडथळा लक्षात घेऊन त्या भागात तात्पुरत्या स्वरूपात १२ मीटर रुंदीकरण केले जाणार असून, उर्वरित रस्ता १५ मीटर रुंदीचा होणार आहे.
प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास गंगापूरवर महात्मा नगर आणि कॉलेज रोडकडून येणाऱ्या वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्या आनंदवली आणि पाइपलाइन रोड भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत वाढली आहे. अरुंद रस्त्यांमुळे या भागातील वाहतूक ठप्प होते आणि हीच वाहतूक पुढे आनंदवली मार्गे गंगापूर रोडला मिळते. यातून कोंडी वाढते. प्रस्तावित भोसला महाविद्यालय ते बारदान फाटा रस्ता विकसित झाल्यास हा पर्यायी मार्ग वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्राधिकरण काय निर्णय घेणार
कुंभमेळा प्राधिकरणकडून सिंहस्थासाठी विकासकामे मंजूर करताना प्रामुख्याने सिंहस्थातील गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन व सिंहस्थ परिसर याला प्राधान्य देते. महापालिकेने सादर केलेला नवीन प्रस्ताव हा नाशिक शहरातील दैनंदिन वाहतूक नियोजनाशी संबंधित आहे. या मार्गाचा सिंहस्थासाठी येणा-या भाविकांना कसा उपयोग होणार, ही बाब महापालिकेला पटवून द्यावी लागणार आहे. त्यावरच प्राधिकरण काय निर्णय घेणार हे ठरणार आहे.