अंबड-सातपूर एमआयडीसीतील सांडपाण्यावर अखेर उपाय; 2 एसटीपींचा प्रस्ताव

सातपूरमध्ये दोन आणि अंबडमध्ये एका जागेचा विचार; सुमारे 250 किमी मलजल वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन
MIDC
MIDCTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील मलवाहिन्या आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामे सुरू असतानाच सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र एसटीपी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेनंतर नाशिक महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे. एमआयडीसीनेही सातपूर आणि अंबड येथे एसटीपीसाठी जागा देण्यास संमती दर्शविली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केला जाणार आहे.

MIDC
सिन्नरमध्ये चिंचोलीत नवे इंडस्ट्रियल टाऊन; NMRDAचे 41 कोटींचे टेंडर

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांसोबतच निवासी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारला जात असताना निवासी भागातील सांडपाण्यासाठी स्वतंत्र एसटीपी उभारण्याचे नियोजन आहे. महापालिकेने यापूर्वीही याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्या वेळी प्रकल्पाची किंमत सुमारे २५० कोटी रुपये होती.

सातपूरमध्ये दोन, अंबडमध्ये एक जागा

औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागाचा विस्तार वेगाने होत असल्याने तेथून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची गरज वाढली आहे. गेल्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीने या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

यापूर्वी एसटीपीसाठी आयटीआय पुलाजवळील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रकल्प रखडल्यानंतर ही जागा अन्य प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आली. आता सातपूर औद्योगिक वसाहतीतील एस-५२ आणि एस-५७ या दोन जागा सुचविण्यात आल्या आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीतील एस-८६ क्रमांकाचा प्लॉट एसटीपीसाठी देण्याची तयारी एमआयडीसीने दर्शविली आहे.

MIDC
Niphad Dry Port: निफाड ड्रायपोर्टला नवसंजीवनी; JNPAच्या सहकार्याने एकात्मिक लॉजिस्टिक्स हब उभारणार

दोन एसटीपी उभारण्याचे नियोजन

सातपूर आणि अंबड येथे प्रत्येकी सुमारे आठ दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. महापालिकेने नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर एमआयडीसीकडे जागेसह निधीची मागणी केली जाणार आहे.

पूर्वीच्या प्रस्तावाची किंमत सुमारे २५० कोटी रुपये होती. नव्या प्रस्तावातील कामांचे स्वरूप आणि वाढलेली किंमत लक्षात घेता सुधारित प्रकल्पाची किंमत त्यापेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे.

२५० किलोमीटरचे मलजल वाहिन्यांचे जाळे

एमआयडीसीकडून निधी मंजूर झाल्यानंतर सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील निवासी क्षेत्राचा विचार करून जवळपास २५० किलोमीटर लांबीचे मलजल वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. या नवीन मलजल वाहिन्या प्रस्तावित एसटीपीला जोडल्या जाणार असून, एसटीपीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

MIDC
Nadhavade MIDC: सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीच्या विकासाला वेग; 15 कोटींच्या कामांची तयारी

Key Points

  • सातपूर आणि अंबड एमआयडीसीमध्ये एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन,

  • एसटीपीसाठी एमआयडीसीकडून तीन जागा सुचविण्यात आल्या,

  • सातपूरमधील एस-५२ आणि एस-५७, तर अंबडमधील एस-८६ प्लॉटचा समावेश,

  • दोन एसटीपी प्रकल्पांची क्षमता प्रत्येकी सुमारे आठ दशलक्ष लिटर,

  • महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सुधारित प्रस्ताव सादर केला,

  • तांत्रिक मंजुरीनंतर एमआयडीसीकडे जागेसह निधीची मागणी केली जाणार,

  • पूर्वीच्या प्रस्तावाची किंमत सुमारे २५० कोटी रुपये होती,

  • सुधारित प्रस्तावाची किंमत वाढण्याचा अंदाज,

  • सुमारे २५० किलोमीटर मलजल वाहिन्यांचे जाळे प्रस्तावित,

  • नवीन मलजल वाहिन्या एसटीपीला जोडल्या जाणार.

Tendernama
www.tendernama.com