सिन्नरमध्ये चिंचोलीत नवे इंडस्ट्रियल टाऊन; NMRDAचे 41 कोटींचे टेंडर

२०२ एकरांवरील औद्योगिक नगराच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात रस्ते, सर्व्हिस रोड, बस-बे व ड्रेनेजची कामे; प्रकल्पासाठी नऊ महिन्यांची मुदत
Sinar MIDC
Sinar MIDCTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे प्रस्तावित औद्योगिक नगराच्या पायाभूत सुविधा विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली आहे. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (NMRDA) या औद्योगिक नगराच्या फेज-१ आणि फेज-२ मधील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामासाठी ४१ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामाची मुदत नऊ महिने असून त्यात पावसाळ्याचाही समावेश आहे.

Sinar MIDC
Nadhavade MIDC: सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीच्या विकासाला वेग; 15 कोटींच्या कामांची तयारी

चिंचोली येथे सुमारे २०२ एकर क्षेत्रावर औद्योगिक नगर विकसित करण्याचे नियोजन आहे. या क्षेत्राची जमीन मोजणी अंतिम टप्प्यात असून, प्रस्तावित औद्योगिक नगरात सुमारे ६० औद्योगिक भूखंड विकसित केले जाणार आहेत. या भूखंडांवर ४५ हून अधिक लहान-मोठे उद्योग उभे राहण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात सुमारे १७ हजार रोजगारनिर्मितीचा अंदाज NMRDAने व्यक्त केला आहे.

रस्त्यांसह ड्रेनेज, सर्व्हिस रोडची कामे

NMRDAने प्रसिद्ध केलेल्या टेंडरनुसार चिंचोली येथील इंडस्ट्रियल टाउन प्लॅनिंग स्कीमच्या फेज-१ आणि फेज-२ अंतर्गत अंतर्गत रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामाची अंदाजित किंमत ४१.६७ कोटी रुपये आहे.

या प्रकल्पात केवळ रस्त्यांचे डांबरीकरण न करता औद्योगिक नगरासाठी आवश्यक रस्ते पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. अस्तित्वातील मार्गांचे रुंदीकरण व मजबुतीकरण, नवीन रस्ते, समांतर सर्व्हिस रोड, चौक व जंक्शन, बस-बे, ड्रेनेज चॅनेल आणि क्रॉस-ड्रेनेजची कामे केली जाणार आहेत.

याशिवाय जोडरस्ते, रोड मार्किंग, कॅट्स आय तसेच दिशादर्शक आणि सावधानता फलकांचीही तरतूद करण्यात आली आहे.

Sinar MIDC
Niphad Dry Port: निफाड ड्रायपोर्टला नवसंजीवनी; JNPAच्या सहकार्याने एकात्मिक लॉजिस्टिक्स हब उभारणार

२०२ एकरांत औद्योगिक नगर

चिंचोली येथील औद्योगिक नगर दोन टप्प्यांत विकसित करण्याचे नियोजन आहे. पहिला टप्पा सुमारे ९० एकर, तर दुसरा टप्पा सुमारे ११२ एकर क्षेत्राचा असेल.

एकूण २०२ एकर जमिनीपैकी सुमारे ६० टक्के जमीन विकसित भूखंडांच्या स्वरूपात संबंधित शेतकऱ्यांना परत देण्याचे नियोजन आहे. उर्वरित ४० टक्के क्षेत्रावर औद्योगिक नगरासाठी आवश्यक सार्वजनिक आणि पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

पाणी, वीज आणि आरोग्य सुविधांचाही समावेश

प्रस्तावित औद्योगिक नगरात कार्यालय, कामगारांसाठी निवास व्यवस्था, अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा आणि वीज यंत्रणेचा समावेश आहे.

विकसित भूखंड शेतकऱ्यांना पुढे उद्योगांना विकता येणार असल्याने या योजनेतून जमीनधारकांनाही आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मोह-चिंचोली येथील २०२ एकरांचा प्रकल्प केवळ औद्योगिक भूखंडांच्या विकासापुरता मर्यादित न राहता विविध पायाभूत सुविधांसह औद्योगिक नगर उभारण्याच्या दिशेने पुढे जाणार आहे.

४१.६८ कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या टेंडरमुळे या प्रकल्पातील पायाभूत सुविधा विकासाला आता प्रत्यक्ष चालना मिळणार आहे.

Sinar MIDC
Nashik Development Plan: नाशिकच्या जिल्हा विकास आराखड्यात रस्ते, लॉजिस्टिक, AI आणि स्टार्टअपवर भर

Key Points

  • ४१.६८ कोटींचे टेंडर : चिंचोली औद्योगिक नगरातील अंतर्गत रस्त्यांसाठी.

  • फेज-१ आणि फेज-२ : दोन्ही टप्प्यांतील रस्त्यांची कामे टेंडरमध्ये समाविष्ट.

  • २०२ एकरांचा प्रकल्प : चिंचोलीत औद्योगिक नगर विकसित करण्याचे नियोजन.

  • ६० औद्योगिक भूखंड : प्रस्तावित भूखंडांची संख्या.

  • ४५ हून अधिक उद्योग : लहान-मोठे उद्योग उभारण्याची शक्यता.

  • १७ हजार रोजगार : पहिल्या टप्प्यात रोजगारनिर्मितीचा अंदाज.

  • ९ महिन्यांची मुदत : रस्ते बांधकामासाठी निर्धारित कालावधी.

  • ड्रेनेज आणि सर्व्हिस रोड : रस्त्यांसोबत चौक, जंक्शन, बस-बे, क्रॉस-ड्रेनेज आदी कामे.

Tendernama
www.tendernama.com