
नाशिक (Nashik) : मध्यरेल्वेने मनमाड जंक्शन येथे रेल्वेचे पहिलेच ११ केव्ही/ ७५० व्होल्टचे कोचिंग विद्युत उपकेंद्र उभारले आहे. या उपकेंद्रातून आता रेल्वे इंजिन व संपूर्ण गाडीला विद्युतप्रवाह मिळू शकणार आहे. यापूर्वी यासाठी रेल्वेला डिझेलचा वापर करावा लागत होता. या विद्युत उपकेंद्रामुळे डिझेलच्या खर्चात वर्षाला कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून वायू प्रदूषणही कमी होणार आहे.
डिझेलवरील रेल्वेमुळे हवेचे प्रदूषण होत असते. यामुळे वायू प्रदूषण रोखण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वेचे पहिलेच ११ केव्ही / ७५० व्होल्टचे कोचिंग विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या विद्युत उप सबस्टेशनच्या उभारणीमुळे धावत्या इंजिन गाडीत विद्युत प्रवाह जाऊन संपूर्ण गाडीला विद्युतप्रवाह मिळणार आहे.
रेल्वे गाडीला विद्युत पुरवठा होणे, गाडतील एसी डब्यांसाठी प्रिकुलींग करणे व देखभाल यासाठी हे विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या पूर्वी पिट लाइनवर एसी डब्यांच्या देखभासाठी विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी डिझेलवर चालणारा डीजी सेट आधी चालवणे आवश्यक होते. याासाठी पॉवरकार कर्मचारी आणि डिझेलचा वापर यांचा वापर करावा लागत होता. हे सर्व करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला डिझेलवर लाखो रुपये खर्च करावा लागत होता. मात्र आता प्री-कुलिंग सुविधेसाठी या विद्युत उपकेंद्राची वीज उपलब्ध होणार आहे.
यामुळे मनमाड रेल्वे स्थानक येथे तयार करण्यात आलेल्या या विद्युत उपकेंद्रामुळे महसूल देखील वाचणार आहे. डिझेलच्या वापरासाठी ३९ कोटी ३२ लाख रुपयांच्या खर्चाच्या तुलनेत या केंद्रामुळे वर्षाला ८ कोटी ९४ लाख रुपये वीज बिल अपेक्षित आहे. या हिशेबाने रेल्वेची दरवर्षी ३०.३८ कोटी रुपयांची निव्वळ बचत अपेक्षित आहे. अतिरिक्त फायदा म्हणून डीजी सेट चालवल्यामुळे होणारे वायू प्रदूषण देखील कमी होईल. त्याचप्रमाणे डिझेलच्या हाताळणी शुल्कातही बचत होईल.