

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांबरोबरच धार्मिक व सेवाभावी आश्रमांमध्येही पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. पात्र आश्रमांना १५ लाख रुपयांपर्यंत निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आतापर्यंत ८४ धार्मिक व सेवाभावी संस्थांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सर्व संस्थांना पूर्ण १५ लाख रुपये मंजूर झाल्यास सुमारे १२.६० कोटी रुपयांची निधीची गरज भासू शकते.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणने प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर केल्यानंतर या भागातील आश्रमांमध्येही पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नोंदणीकृत आश्रमांना नाव नोंदणीसाठी आवाहन केल्यानंतर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत ८४ आश्रमांनी नोंदणी करून त्यांच्या आश्रमासाठी आवश्यक असणा-या पायाभूत सुविधा व त्यासाठी अपेक्षित निधीची मागणी केली आहे. त्यानुसार या आश्रमांना प्रत्येकी १५ लाख रुपयांप्रमाणे साधारणतः १२ कोटी रुपये निधीची आवश्यकता भासणार आहे.
देशात चार ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. त्यात महाराष्ट्रात नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी स्वतंत्र शाहीस्नान होत असल्याने सरकारला दोन दोन ठिकाणी साधुग्रामची उभारणी करावी लागते. तसेच हा सिंहस्थ पावसाळ्यात येतो व त्र्यंबकेश्वर येथे सरासरी दोन हजार मिमी पाऊस पडतो. यामुळे त्र्यंबकेश्वर येथे साधुग्रामपेक्षा आखाड्यांच्या जागेत कायमस्वरुपी बांधलेल्या इमारतींमध्येच थांबण्यास साधुमहंत प्राधान्य देत असतात. यामुळे सरकारकडून त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्येच या साधुंसाठी पायाभूत सुविधा उभारू देते. त्यात प्रामुख्याने कायमस्वरुपी शेड, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, स्वच्छतागृह या कामांचा समावेश असतो.
यावेळी कुंभमेळा प्राधिकरणने त्र्यंबकेश्वर येथील १० व नाशिक येथील ३ आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये व आश्रमांना प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर केले असून त्यातील आखाड्यांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये निधीतील कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत.
आश्रमांमध्ये अद्याप कामांना प्रारंभ झालेला नसल्याने नोंदणीकृत आश्रमांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणकडून करण्यात आले होते. त्यातील नाशिक येथील आश्रमांच्या निवडीची जबाबदारी नाशिक महापालिका आयुक्त व त्र्यंबकेश्वर येथील आश्रम निवडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
आश्रमांना केलेल्या आवाहनानुसार भाविकांची सेवा करणाऱ्या ८४ धार्मिक आणि सेवाभावी संस्थांनी आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली आहे. शासनाने पात्र संस्थांना १५ लाख रुपयांपर्यंत या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरू झालेल्या या हा प्रक्रियेत आता अर्ज आणि मागण्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीला सुरुवात झाली आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्यूआर कोडआधारित एकल खिडकी डिजिटल प्रणालीद्वारे १९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यात धार्मिक व सेवाभावी संस्थांनापायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पात्र संस्थांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले होते.
या नोंदणी केलेल्या संस्थांपैकी ३१ संस्थांनी तब्बल ५ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांच्या पायाभूत सुविधांची मागणी केली आहे. नोंदणी झालेल्या ८४ पैकी तब्बल ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यात नाशिक तालुक्यातील ३५ आणि त्र्यंबकेश्वरमधील २० संस्थांचा यात समावेश आहे. तर उर्वरित १३ संस्था बाहेरील आहेत.
Key Points
सिंहस्थासाठी ८४ धार्मिक आणि सेवाभावी संस्थांनी ऑनलाइन नोंदणी केली
पात्र संस्थांना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंत पायाभूत सुविधा देण्याचा निर्णय
कमाल मर्यादेनुसार ८४ संस्थांसाठी १२ कोटी ६० लाख रुपयांची आवश्यकता
३१ संस्थांनी पाच कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांच्या सुविधांची मागणी केली
अर्ज आणि मागण्यांची प्रत्यक्ष पडताळणी सुरू
नाशिक जिल्ह्यातील ७१ आणि जिल्ह्याबाहेरील १३ संस्थांची नोंदणी
नाशिक तालुक्यातील ३५ आणि त्र्यंबकेश्वरमधील २० संस्थांचा समावेश
क्यूआर कोडआधारित प्रणालीद्वारे १९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले
आश्रमांमधील पायाभूत सुविधांच्या कामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील आश्रमांच्या निवडीची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणांकडे