

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहराचे रूपडे पालटण्याच्या दृष्टीने रस्ते, प्रमुख चौक, प्रवेशद्वारे आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने ‘थीम बेस्ड’ सुशोभीकरणासाठी वास्तुविशारद आणि अर्बन डिझायनरची नियुक्ती करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली आहे. त्या कामांमध्ये प्रामुख्याने प्रमुख रस्त्यांवरील प्रवेशद्वारे, चौकांचे सुशोभीकरण, लँडस्केपिंग, स्पॉट ब्युटीफिकेशन, स्ट्रीट फर्निचर, दिशादर्शक फलक तसेच कलात्मक स्थापत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांमुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वर या शहरांची धार्मिक व सांस्कृतिक ओळख ठळकपणे नजरेत भरणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन या परिसरात आतापर्यंत ३४ हजार ७५० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थात येणा-या भाविकांना सहज मार्गक्रमण करता यावे, वाहतूक व्यवस्था सुलभ व्हावी आणि शहराची धार्मिक-सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसावी, यासाठी रस्ते आणि चौकांच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.
या प्रकल्पात केवळ रंगरंगोटी किंवा सौंदर्यीकरण न करता शहरी रचनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये वाहतूक सुरळीत होणे, पादचाऱ्यांची सुरक्षितता, दिशादर्शक व्यवस्था, सार्वजनिक सोयी आणि परिसराची दृश्यात्मक गुणवत्ता यांचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यांच्या कडेला लँडस्केपिंग, हार्ड आणि सॉफ्ट लँडस्केप, स्ट्रीट फर्निचर आणि स्थानिक संस्कृतीशी संबंधित कलात्मक स्थापत्ये उभारली जाणार आहेत.
प्रमुख रस्त्यांवर कमानी
सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यासाठी विद्यमान प्रवेशद्वारांचे पुनर्रचना तसेच नव्या प्रवेशद्वारांची उभारणी प्रस्तावित आहे. नाशिकमध्ये सध्या नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड, गंगापूर रोड, नांदूर नाका, दिंडोरी गेट आणि साधुग्राम या ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत.
याशिवाय मुंबई-नाशिक रोड, पेठ-नाशिक रोड, धुळे-नाशिक रोड, पुणे-नाशिक रोड, अमृत मार्ग, साधुग्राम-नाशिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड, जव्हार-त्र्यंबकेश्वर रोड, अमृत मार्ग-त्र्यंबकेश्वर आणि साधुग्राम-त्र्यंबकेश्वर या मार्गांवर प्रस्तावित प्रवेशद्वारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या विविध दिशांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकांना सुरुवातीलाच सिंहस्थाचे वातावरण अनुभवता येणार आहे. प्रवेशद्वारांची रचना नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी सुसंगत ठेवण्याचे नियोजन आहे.
चौकांना नवा लूक
शहरातील महत्त्वाच्या जंक्शनचे सुशोभीकरण हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. चौकांची रचना करताना केवळ सौंदर्याचा विचार न करता वाहतूक कोंडी कमी करणे, पादचारी सुरक्षितता, गर्दीचे व्यवस्थापन आणि दिशादर्शक व्यवस्था यावर भर दिला जाणार आहे. सिंहस्थाच्या काळात लाखो भाविक एकाच वेळी शहरातील प्रमुख मार्गांवर येणार असल्याने या चौकांचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच प्रमुख मार्गांवरील ठराविक ठिकाणी ‘स्पॉट ब्यूटीफिकेशन’ केले जाणार आहे. लँडस्केपिंग, कलात्मक स्थापत्ये आणि स्थानिक संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या कलाकृतींचा वापर करून रस्त्यांचा परिसर आकर्षक केला जाणार आहे.
घाटांचेही सुशोभीकरण
रस्ते आणि चौकांबरोबरच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील विद्यमान घाटांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाचाही प्रकल्पात समावेश आहे. नदीकाठची स्थिती सुधारण्याबरोबरच घाटांवरील दुरुस्ती, सुरक्षितता, प्रवेश व्यवस्था आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन घाटांची रचना करण्यात येणार असल्याने पारंपरिक स्वरूप कायम ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
कायमस्वरुपी नियोजन
या कामांचे नियोजन केवळ सिंहस्थाच्या कालावधीपुरते मर्यादित न ठेवता सिंहस्थानंतरही शहरासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने करण्याच्या सूचना आहेत. मोठ्या प्रमाणातील गर्दी, पावसाळा, बदलते हवामान आणि सततच्या वापरामुळे होणारी झीज लक्षात घेऊन टिकाऊ साहित्य व देखभाल सुलभ असलेली रचना करण्यावर भर देण्यात आला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी उभारल्या जाणाऱ्या विविध पायाभूत सुविधांना हे सुशोभीकरण जोडले जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, महापालिका रस्ते आणि अन्य संबंधित यंत्रणांच्या कामांशी समन्वय साधून ही कामे करण्याची जबाबदारी नियुक्त होणाऱ्या वास्तुविशारद, अर्बन डिझायनर यांच्यावर राहणार आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी शहरातील रस्ते आणि प्रमुख चौकांना केवळ नवा चेहरा मिळणार नसून, भाविकांची वाहतूक आणि शहरातील मार्गदर्शन व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Key Points
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ‘थीम बेस्ड’ सुशोभीकरण,
सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा प्राधिकरणाचा अंदाज,
परिसरातील ३४,७५० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी,
रस्ते, चौक, प्रवेशद्वारे, घाट आणि सार्वजनिक ठिकाणांचा विकास,
वाहतूक, पादचारी सुरक्षा आणि दिशादर्शक व्यवस्थेला प्राधान्य,
सिंहस्थानंतरही उपयोगी ठरेल, अशा टिकाऊ रचनेवर भर.