Nashik Infra: सिंहस्थाच्या निमित्ताने 'या' 5 रेल्वेस्थानकांचा बदलणार चेहरामोहरा

Nashik Railway Infra Boost
Nashik Railway Infra BoostTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक येणार असून देशभरातून रेल्वेने येणा-या भाविकांच्या सुविधांसाठी नाशिरोड रेल्वेस्थानकासह देवळाली, ओढा, खेरवाडी, सुकेणे या रेल्वेस्थानकांचा विकास केला जात आहे. या पाच स्थानकांच्या विकासासाठी व तेथे भाविकांसाठी सुविधा उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालय, कुंभमेळा प्राधिकरण यांनी जवळपास १,४५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील ९२ कामांपैकी ९० कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

Nashik Railway Infra Boost
Nashik Kumbh Mela 2027: सिंहस्थानिमित्त इगतपुरी, त्र्यंबकमध्ये होणार 3 पर्यटनस्थळांचा विकास

या विकासकामांमध्ये प्रामुख्याने रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, यार्ड पुनर्रचना, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग, पादचारी उड्डाण पूल, प्लॅटफॉर्म रुंदीकरण, कव्हर शेड, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतागृहे, होल्डिंग एरिया तसेच विद्युत आणि सिग्नलिंगशी संबंधित सुविधांचा समावेश आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील अमृतस्नान पर्वणींच्या दिवशी कोटींच्या संख्येत भाविक येतील व इतर काळात लक्षावधी भाविक येतील, असे गृहित धरून कुंभमेळा प्राधिकरणने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात घाटांची संख्या, रस्ते, वाहनतळ यांची उभारणी केली आहे.

याशिवाय देशभरातून रेल्वेने लाखो भाविक येतील, हे गृहित धरून केवळ नाशिकरोड रेल्वेस्थानक एवढ्यामोठ्या संख्येने येणा-या भाविकांसाठी पुरेसे ठरणार नाही, ही बाब लक्षात घेऊन नाशिकरोडसह देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख स्थानकांवर प्रवासी सुविधा आणि रेल्वे स्थानक अधिक सक्षम करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेने या आराखड्यातील कामांना मंजुरी देऊन ही कामे प्रत्यक्षात सुरू आहेत.

Nashik Railway Infra Boost
Nashik: सिंहस्थातील व्हाईट टॉपिंग रस्ते संशयाच्या भोवऱ्यात! काय आहे कारण?

यामुळे या पाच रेल्वेस्थानकांवर नऊ नवीन पादचारी उड्डाण पूल उभारले जात असून, त्यामध्ये नाशिक रोड येथे १२ मीटर रुंदीचा, तर उर्वरित स्थानकांवर सहा मीटर रुंदीचे आठ पूल बांधले जात आहेत. याशिवाय प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, नवीन उंचस्तरीय प्लॅटफॉर्म आणि ५१ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर कव्हर शेड उभारण्याची कामे सुरू आहेत.

देवळाली होणार टर्मिनल
नाशिक येथे रेल्वेने येण्यासाठी व नाशिकहून रेल्वेने जाण्यासाठी मध्यरेल्वेमार्गावरील नाशिकरोड रेल्वेस्थानक हा पर्याय आहे. मात्र, या ठिकाणी टर्मिनल, लूप लाईन्स आणि पिट लाईन्स नसल्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून रेल्वेगडी सुटत नाही. यामुळे नाशिकला रेल्वेने येण्यात अनेक अडचणी येतात. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या मर्यादा लक्षात घेऊन मध्यरेल्वेकडून त्याच्या नजिक असलेल्या देवळाली स्थानकाचा प्रमुख रेल्वे संचालन व प्रवासी व्यवस्थापन केंद्र म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने देवळाली येथे नवीन टर्मिनल प्लॅटफॉर्म, तीन अतिरिक्त लूप लाईन्स, स्टेबलिंग लाईन, पिट लाईन्स, सिक लाईन आणि शंटिंग नेकची उभारणी सुरू आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह दोन नवीन उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, दोन पादचारी पूल, अतिरिक्त कव्हर शेड, अडीच लाख लिटर क्षमतेची जलसाठा व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि दोन कायमस्वरूपी होल्डिंग एरिया विकसित केले जात आहेत. या सुविधांमुळे नाशिक येथून देशभरात जाण्यासाठी रेल्वेगाड्या सुरू होतील. तसेच देशातील कोणत्याही स्थानकावरून नाशिकसाठी स्वतंत्र रेल्वेगाड्या येऊ शकणार आहे. यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वरला रेल्वेने येणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकणार आहे.

Nashik Railway Infra Boost
Smart City Nashik: नाशिकच्या पहिल्या स्मार्ट रस्त्याचे फूटपाथ तुटणार; 21 कोटींचा खर्च वाया

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या नाशिकरोड स्थानकावर सर्वाधिक विकासकामे सुरू आहेत. यार्ड पुनर्रचना, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, १२ मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल, विद्यमान पुलाच्या जागी सहा मीटर रुंदीचा नवीन पूल, सहा लिफ्ट, प्लॅटफॉर्म रुंदीकरण, अतिरिक्त कव्हर शेड, जलसाठा सुविधांचा विस्तार आणि १६ नवीन स्वच्छतागृहांची उभारणी केली जात आहे.

अमृतस्नान पर्वणीच्या काळातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन कायमस्वरूपी होल्डिंग एरियाही विकसित करण्यात येत आहेत. ओढा स्थानकावर तीन अतिरिक्त लूप लाईन्स, सहा स्टेबलिंग लाईन्स, दोन पादचारी पूल, नवीन प्लॅटफॉर्म, कव्हर शेड, अडीच लाख लिटर क्षमतेची जलसाठा व्यवस्था, १२ स्वच्छतागृहे आणि दोन होल्डिंग एरिया उभारले जात आहेत. खेरवाडी स्थानकावर तीन स्टेबलिंग लाईन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, दोन नवीन पादचारी पूल, दोन अतिरिक्त उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, कव्हर शेड, जलसाठा व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची उभारणी सुरू आहे.

Nashik Railway Infra Boost
Nashik: गंगापूर रोडला समांतर मार्गासाठी आता 66 कोटींचा नवा प्रस्ताव; प्राधिकरण काय निर्णय घेणार?

कसबे सुकेणे स्थानकावर अतिरिक्त लूप लाईन, तीन स्टेबलिंग लाईन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण, दोन पादचारी पूल, कव्हर शेड, एक लाख लिटर क्षमतेची जलसाठा व्यवस्था, आठ स्वच्छतागृहे आणि दोन होल्डिंग एरिया विकसित करण्यात येत आहेत.

याशिवाय रेल्वेवाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी मनमाड–इगतपुरी दरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली, १२ स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ट्रॅक्शन वितरण व्यवस्था तसेच नागरी, अभियांत्रिकी, सिग्नल आणि विद्युत विभागांच्या समन्वयातून विविध पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ट्रॅक लिंकिंग व अन्य तांत्रिक कामे पूर्ण केली जात आहे.

या सर्वसमावेशक विकास कार्यक्रमामुळे रेल्वेची वहनक्षमता, सुरक्षा आणि प्रवासी सुविधा मोठ्या प्रमाणात वाढणार असून सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाच्या रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Tendernama
www.tendernama.com