

नाशिक (Nashik): सिंहस्थानिमित्त खडकाळी सिग्नल ते आयटीआय या त्र्यंबक रस्त्यावरील साधारण एक किलोमीटर रस्त्याचे व्हाइट टॉपिंगचेकाम झाले असून त्यावरून वाहतूक सुरू होण्याच्या आतच त्याला तडे गेले आहेत. तसेच इतर ठिकाणीही काँक्रिट पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. यातून सिंहस्थाच्या कामांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा तसेच ठेकेदार यांच्या कामकाजाविषयी संशय निर्माण झाला आहे.
काम झाल्यानंतर काही दिवसांतच तडे जात असतील, तर त्यामागे योग्यक्षमतेच्या काँक्रिटचा वापर केला नसेल किंवा संबंधित ठेकेदाराकडे तसे काम करण्याचा अनुभव असलेले कर्मचारी, अधिकारी नसतील, अशी कारणे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितली जात आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या रस्त्याचा निकृष्ट भाग जेसीबीद्वारे काढून घेत रस्ता नव्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, रस्ता तयार करतानाच त्यासंबंधिच्या मानकांचे पालन केले जात नसेल, तर किती वेळ रस्ते खोदणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंहस्थानिमित्त नाशिक शहरात २८ प्रमुख रस्त्यांचे काम सध्या सुरू आहेत. त्यासाठी सुमारे एक हजार २३० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या कामांची अंमलबजावणी यंत्रणा नाशिक महापालिका आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे ध्येय आहे. त्यातील ६० टक्के कामे ही व्हाइट टॉपिंग केली जाणार आहे. म्हणजे आधीच्या डांबरी रस्त्यांवरील डांबराचा थर काढून त्या जागी कॉंक्रिटचा थर देणे याला व्हाइट टॉपिंग म्हणतात. ही कामे डांबरी रस्त्यापेक्षा अधिक काळ टिकतात व कॉंक्रिटीकरणापेक्षा कमी खर्च येतो, यामुळे व्हॉइट टॉपिंगला प्राधान्य दिले आहे. मात्र, या व्हॉइट टॉपिंगच्या पहिल्या एक किलोमीटरच्या कामाचा सुमार दर्चा बघता, व्हाइट टॉपिंगच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या कामांच्य गुणवत्ता नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी महापालिकेचा बांधकाम विभाग, कुंभमेळा प्राधिकरणचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभाग अशी त्रिस्तरीय तपासणी यंत्रणा कार्यरत आहेत. तरीदेखील काम निकृष्ट होत असेल, तर या यंत्रणांमधील अभियंते अथवा ठेकेदार कंपनीचे अभियंते यांना व्हाइट टॉपिंगचे रस्ते कसे केले जातात, याचा अनुभन नसण्याची शक्यता अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात अनेक वर्षे काम केलेल्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार व्हाइट टॉपिंगचे काम करताना त्या रस्त्याचा वापर कसा होणार हे बघून त्यासाठीच्या सामग्री निश्चित केली जाते. त्यानुसार सिमेंटचा दर्जा, त्याचे वापराचे प्रमाण तसेच त्यावर दाब पडल्यानंतर तडे जाऊ नये म्हणून विशिष्ट अंतरावर जॉइंट देणे, दोन जॉइंटच्या मध्ये सळई टाकणे, याबाबी फार महत्त्वाच्या असतात. याशिवाय एकदा व्हाइट टॉपिंगचे काम केल्यानंतर विशिष्ट वेळेत त्यावर चिरा ओढणे महत्वाचे असते. त्यातील एका बाबीचेही पालन झाले नाही, तर ते काम निकृष्ट होण्याचा म्हणजे रस्त्याला तडे जाण्याचा धोका असतो.
त्र्यंबक नाका ते वेदमंदिर या रस्त्यावरील कॉंक्रिट एका पावसाने वाहून जाणे अथवा त्याला तडे जाण्याचे प्रकार बघता, एक तर ठेकेदार कंपनीकडे व्हाइट टॉपिंगच्या कामाचे अनुभव असलेले अभियंते नाहीत. तसेच त्यांच्याकडून त्या मानकांचे पालन होत नसेल, तर ते लक्षात आणून देण्यासाठी महापालिका, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्याकडेही तसा अनुभव असलेले अधिकारी नसावेत, असा संशय या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
कितीवेळा रस्ते खोदणार?
महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांना गुणवत्ता मानांकनानुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा संपूर्ण भाग पूर्णपणे काढत, पुन्हा नव्याने उभारण्याचे आदेश जागेवर दिले. तसेच निकृष्ट कामासाठी ठेकेदाराला एक लाख ८४ हजार रुपये प्रतिदिन इतका दंड ठोठावला आहे. यापूर्वीही याच ठेकेदाराला ५० हजार रुपयांचा दंड केला होता. आता सिंहस्थाला केवळ वर्षभराचा कालावधी शिल्लक असून त्यापूर्वी कामे करण्यासाठी ती गुणवत्तापूर्ण व वेगाने होणे याला प्राधान्य आहे.
ठेकेदार व महापालिकेचा बांधकाम विभाग यांच्याकडेच व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाची माहिती असलेले मनुष्यबळ नसेल, तर काम निकृष्ट होणार व प्रत्येकवेळी सिंगम स्टाईलने उखडले जाणार असेस, तर कामे वेळेत होतील का, हा खरा प्रश्न आहे. यामुळे काम झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा काम होत असतानाच बांधकामाच्या मानकांचे पालन केले जात आहे किंवा नाही, याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना या अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
व्हाइट टॉपिंगचे तंत्रज्ञान
काँक्रिटचा रस्ता तयार करताना स्टिल व सिमेंटचा वापर केला जातो. मात्र, व्हाइट टॉपिंग रस्ता हा आधीच्या डांबरी रस्त्यावर सिमेंटचा थर टाकून तयार केला जातो. त्यात रस्त्याच्या गरजेनुसार स्टिलचा वापर केला जातो. या रस्त्यासाठी भार पेलण्यासाठी कॉंक्रिटची जाडी, कॉंक्रिटची लवचिक क्षमता, आधीच्या डांबरी रस्त्याच्या थराची ताकद व योग्य अंतरावर दिलेले जॉइंट या चार बाबी फार महत्वाच्या असतात. यामुळे मुख्य स्लॅबमध्ये स्टीलची आवश्यकता अनेक वेळा नसते. तापमान वाढल्यानंतर कॉंक्रिट प्रसरण पावल्यानंतर किंवा तापमान कमी झाल्यानंतर ते आकूंचन पावल्यानंतर योग्य अंतरावर जॉइंट नसतील, तर तडे जाण्याचा धोका असतो. म्हणून जॉइंट्स देऊन तडे पडण्याचे स्थान नियंत्रित केले जाते.
जॉइंटचे कॉंट्रॅक्शन, एक्सपान्शन जॉइंट, कंस्ट्रक्शन जॉइंट, लॉंजिट्युडनल जॉइंट, असे चार प्रकार असतात.. त्या मोठ्या लांबीच्या रस्त्यांवर, पूर, चौक या ठिकाणी एक्सपान्शन जॉइंटचा वापर केला जातो. एका दिवसाचे काम संपल्यावर दुस-या दिवशी काम सुरू करताना कंस्ट्रक्शन जॉइंट दिले जातात. तसेच दोन लेनच्यामध्ये लॉंजिट्युडनल जॉइंट दिला जातो. व्हाइट टॉपिंगच्या कामांमध्ये डोवेल बार म्हणजे स्टीलची गुळगुळीत सळई हाही एक महत्वाचा भाग आहे. एका स्लॅबवर भार पडल्यानंतर शेजारच्या स्लॅबवरही त्याचा परिणाम होतो. तो टाळण्यासाठी दोन स्लॅबच्या मध्ये ही स्टीलची सळई टाकून भार व्यवस्थापन केले जाते. यामुळे जॉइंटमध्ये दोष निर्माण होत नाही व रस्त्याचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
व्हाइट टॉपिंगचे काम करताना जॉइंट कटिंग हा सर्वात महत्वाचा भाग आहे. काम केल्यानंतर चार ते १२ तासांच्या आत सॉ कटिंग केले जाते. ते करण्यास उशीर झाल्यास त्या रस्त्याला आपोआप कोठेही तडे जातात. भारतातील व्हाइट टॉपिंगचे रस्ते याच कारणांमुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. पारपरिक व्हाइट टॉपिंग म्हणजे जाड थरांच्या रस्त्यांवर जॉइंटचे अंतर साडेतीन ते साडेचार मीटर असावे, पातळ व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यावर तेच अंतर एक ते दोन मीटर व अल्ट्राथीन व्हाइट टॉपिंग रस्त्यावर अर्धा ते दीड मीटर अंतरावर जॉइंट असावे, असा सर्वसाधारण नियम आहे. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सिमेंट.
व्हॉइट टॉपिंगच्या रस्त्यांसाठी एम४० किंवा रस्त्याच्या आराखड्यानुसार सिमेंटचा दर्जा राखणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यांची कामे करताना कमी सिमेंट वापरून नफा वाढवण्याच्या ठेकेदारांच्या सवयीमुळेही येथे सिमेंटची गुणवत्ता व पुरेसे प्रमाण याचे पालन केले जात नसावे, यामुळेही तडे गेले असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.