

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मंजूर करण्यात आलेल्या बहुतांश प्रकल्पांची पूर्वतयारीची कामे अंतिम टप्प्यात असून आता मुख्य कामे सुरू करण्याची वेळ आली असता ठेकेदारांसमोर खडी पुरवठ्याचा प्रश्न समोर आला आहे. या कामांसाठी टेंडर भरताना ठेकेदारांनी या कामांसाठी खडी १० किलोमीटरवरून वाहतूक करावी लागेल, असे गृहित धरले असताना आता कामे सुरू करताना त्यांना २० किलोमीटरवरून खडी आणावी लागणार आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च दुपटीने वाढला आहे. यामुळे किमान सिंहस्थातील कामांसाठी नाशिक तालुक्यातील सारूळ येथील खानपट्टे सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी होत आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात हजारो कोटींची रस्त्यांचा कामे मंजूर केली आहेत. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे २२०० कोटींची राज्यमार्गाची कामे आहेत. या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण झाली असून आधीचे रस्ते खोदून त्यावर दगड, खडी टाकून झाली आहे. आता या मार्गांचे डांबरीकरण करण्यापूर्वीच्या थरांची कामे सुरू आहेत. त्यात नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणापूर्वी पुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यानंतर कॉंक्रिटीकरण सुरू होईल.
नाशिक शहरातही २८ रस्त्यांची कामे करण्यापूर्वी युटिलिटी डक्टची कामे जवळपास पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर या रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू होणार आहेत. याशिवाय नाशिक व त्र्यंबेकश्वरमध्ये गोदावरीवर २० किलोमीटर लांबीचे घाट उभारण्यापूर्वी तेथील खोदकाम व सपाटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्याचप्रमाणे रिंगरोडसाठी थेट खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत जाईल तसतशी कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी खडी-कच पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सारूळ येथील खाणपट्टा बंद असल्यामुळे बांधकामासाठी लागणारा कच्चा माल सिन्नर आणि दिंडोरी येथून - आणावा लागत असून, त्यामुळे - खर्चात मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सारूळ येथील खाणपट्टे तातडीने सुरू करण्याची मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून सारूळ परिसर हा गौण खनिजांचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. मात्र, तेथील खाणपट्ट्यांबाबतचा प्रशासकीय निर्णय प्रलंबित आहे. यामुळे तेथील उत्खनन आणि पुरवठा सध्या बंद आहे. खडीच्या मर्यादित उपलब्धतेमुळे नव्या प्रकल्पांसह सुरू असलेल्या विकासकामांच्या गतीवरही परिणाम होत आहे. हा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामे मुदतीत पूर्ण करणे शक्य होणार नसल्याची भीती ठेकेदारांची संघटना असलेल्या बिल्डर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.
सारूळ येथील जवळचे खाणपट्टे बंद असल्याने ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांना खडीसाठी सिन्नर व दिंडोरी तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे इंधन, वाहनभाडे आणि मनुष्यबळाचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, बांधकाम साहित्याच्या किमतीपेक्षा त्याच्या वाहतुकीवरच अधिक खर्च होत असल्यांची तक्रार व्यक्त केली जात आहे.