

नाशिक (Nashik): विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी, २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित हजारो कोटींची महत्त्वाची टेंडर प्रक्रिया आणि रिंगरोडचे कार्यारंभ आदेश (Work Order) २५ जूनपर्यंत पूर्णपणे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात लागू झाली आहे. याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कामांवर होणार आहे. यामुळे सिंहस्थाशी संबंधित कामे ही तातडीची असल्याने त्यांना या आदर्श आचारसंहितेतून वगळण्याची मागणी पुढे येत आहे.
तसेच सध्या जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारकीर्द असल्याने नाशिक जिल्हा परिषदते सदस्य नाहीत. तसेच १५ पंचायत समित्यांमध्ये सभापती नसल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना आदर्श आचारसंहिता लागू करण्याचे काहीही औचित्य नसल्याची चर्चा आहे. तसेच या आचारसंहितेमुळे विनाकारण जिल्हा परिषदेच्या टेंडर प्रक्रिया, कार्यारंभ आदेश खोळंबणार असल्याचे दिसत आहे.
या आचारसंहितेमुळे रिंगरोडच्या कामांचे कार्यारंभ आदेश देता येणार नाहीत. यामुळे सिंहस्थाशी संबंधित कामे या आचारसंहितेतून वगळण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे.
राज्यातील विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ आमदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने १८ मे रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिकसह १७ जिल्ह्यांमध्ये २५ जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. या काळात प्रशासकीय मान्यता देणे, टेंडर प्रसिद्ध करणे, टेंडरचे तांत्रिक व वित्तीय लिफाफा उघडणे व कार्यारंभ आदेश देणे या बाबींवर निर्बंध असतात.
नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर पंचायती, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सध्या नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व नाशिक जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यातील काही परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने कामे मंजूर करण्यात आली आहेत.
सिंहस्थानिमित्ताने हजारो कोटींच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले असले, तरी अनेक कामे प्रशासकीय मान्यता, टेंडर प्रक्रियेच्या पातळीवर आहे. आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्यामुळे या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे.
सिंहस्थानिमित्त मंजूर केलेली कामे पुढील वर्षी ३१ मे पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अवघा वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यात महिना-दीड महिना आचारसंहितेच्या काळात गेला, तर ती कामे पूर्ण होण्यास त्याप्रमाणात उशीर होईल. यामुळे ती कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण करणे अशक्य होईल.
या आचारसंहितेच्या कचाट्यात प्रामुख्याने त्र्यंबेकश्वर येथील दर्शन पथ, द्वारका ते नाशिकरोड या ६.४ किलोमीटर रस्ता या कामांची टेंडर अडकले आहेत. याशिवाय कावनई, बेझे व सर्वतीर्थ टाकेद येथील ७५ कोटींच्या कामांना कुंभमेळा प्राधिकरणने मान्यता दिली असली, तरी त्या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेल्या नाहीत. यामुळे ही कामेही आचारसंहितेमुळे रखडणार असल्याचे दिसत आहे.
सिंहस्थानिमित्ताने नाशिकमधील देवळाली, ओढा, सुकेणे, खेरवाडी या रेल्वेस्थानकांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. या कामांचे टेंडर पूर्ण झाले असले तरी अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. यामुळे या पाणी पुरवठा योजनांची कामेही २५ जूनपर्यंत रखडणार आहेत. अशीच परिस्थिती नाशिक शहराभोवती उभारण्यात येत असलेल्या रिंगरोडच्या टेंडरची आहे.
या रिंगरोडच्या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असली, तरी अद्याप ठेकेदार कंपन्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. यामुळे नजिकच्या काळात भूसंपादन पूर्ण झाले, तरी आचारसंहितेमुळे कार्यारंभ आदेश देता येणार नाहीत. याचप्रमाणे नाशिक महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे टेंडर प्रसिद्ध केले असून ते टेंडरही या आचारसंहितेत अडकले आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाने तपोवनरोडचे ३० मीटर रुंदीकरण करण्यास मान्यता दिली असली, तरी त्या कामाला अद्याप प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. या आचारसंहितेचा नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामांना आदर्श आचारसंहितेतून सूट देण्यात यावी,अशी मागणी होत आहे.
यासाठी प्रशासनाच्या पातळीवरून निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामांचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.
आचारसंहितेमुळे रखडणार ही कामे
नाशिक रिंगरोडच्या कामांचे कार्यारंभ आदेश
त्र्यंबेकश्वर येथील दर्शन पथ संबंधी दोन टेंडर
द्वारका ते नाशिकरोड या ६.४ किलोमीटर रस्ता या कामाचे टेंडर
कावनई, बेझे व सर्वतीर्थ टाकेद येथील कामांच्या प्रशासकीय मान्यता व टेंडर
देवळाली, ओढा, सुकेणे, खेरवाडी या रेल्वेस्थानकांसाठी पाणी पुरवठा योजनांचे कार्यारंभ आदेश
तपोवन रस्ता कामाची प्रशासकीय मान्यता व टेंडर